पुणे : राज्याच्या सत्तेत वाटेकरी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांद्वारे पहिली परीक्षा झाली आणि या परीक्षेत उत्तीर्ण होत जिल्ह्यात अजित पवार यांचीच ‘दादागिरी’ चालते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या निवडणुकांमध्ये बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये जुन्या पिढीच्या हातातील सत्ता जाऊन तरुण उमेदवार निवडून आल्याने अजित पवार यांची ’पॉवर’ही दिसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात अस्वस्थता पसरली आहे.
या निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर झाल्या नसल्या, तरीही अजित पवार यांच्या पाठिशी तरुणांची फळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची ही रंगीत तालीम जिंकण्यात अजित पवार यांना यश आले आहे. जिल्ह्यातील २२९ ग्रामपंचायतींपैकी १५८ जागांवर अजित पवार यांना मानणारे उमेदवार निवडूण आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार समर्थक गटाला अवघ्या पाच जागा मिळाल्याने अजित पवार हे या निवडणुकीच्या माध्यमातून पहिली परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा : कर्नाटकमध्ये विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्तच, भाजपाच्या केंद्रीय नेत्यांच्या मनात नेमके काय?
बारामतीत अजित पवारांना यश, आनंद भाजपला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मावळ वगळता भाजपचे फारसे अस्तित्त्व नसताना भाजपने ग्रामपंचायतीच्या १९ जागा मिळविल्या आहेत. त्यामध्ये पवार यांच्या बारामतीतील काटेवाडीतच भाजपचे दोन सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गोटात खळबळ उडाली आहे. या निकालाद्वारे भाजपने बारामतीत चंचूप्रवेश केला आहे. मात्र, संबंधित दोन्ही सदस्य हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच असून, ते अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायती या अजित पवार गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते ही बदलली असून, अजित पवार यांच्या पाठिशी बारामती तालुका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : लवकरच ‘भारत जोडो यात्रे’चे दुसरे पर्व? काँग्रेसकडून तयारीला सुरुवात!
त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘मिशन बारामती’ची ही पाहिली यशस्वी मोहीम मानली जात असून, यश हे अजित पवारांना; पण आनंद भाजपला झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वळसे पाटील, कोल्हेंना धक्का बारामती लोकसभा मतदार संघात मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि भाजपला साथ दिली असली, तरी शिरुर लोकसभा मतदार संघात मतदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे या दोघांना स्वत:च्या गावातील ग्रामपंचायती राखण्यात अपयश आले आहे. वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात शिवसेना शिंदे गटाचा सरपंच निवडून आला आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामपंचायतीत डॉ. कोल्हे यांच्या गटाचा पराभव झाला आहे. त्यामुळे दोघांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मात्र इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायत स्वत:कडे राखण्यात यश मिळविले आहे.