छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील विधानसभा निवडणूक होत असलेल्या ४६ मतदारसंघापैकी तीन जिल्ह्यांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार नाही. त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे. तर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एकच उमेदवार आहे.

ज्या धाराशिव जिल्ह्यातील चारपैकी एकही विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेला आला नाही त्या जिल्ह्याचे अजित पवार हे जावई आहेत. त्यांच्या पत्नी तथा राज्यसभा सदस्या सुनेत्रा पवार यांचे माहेर तेर आहे. धाराशिवमध्ये उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर व परांडा हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी तीन विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन उमेदवार आहेत.

हेही वाचा :एमआयएमचे वारिस पठाण भिवंडीतून रिंगणात, मतविभाजनाचा फटका काँग्रेसला ?

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असून तेथून राणाजगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. राणा पाटील हे अजित पवार यांचे नातेवाईक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अखंडित असताना राणा पाटील हे त्या पक्षात जिल्हाध्यक्षपदावर होते. मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवत विजयीही झाले.

हेही वाचा : राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ

जालना जिल्ह्यात माजी आमदार अरविंद चव्हाण हे अजित पवार यांच्या पक्षाचे स्थानिक नेते आहेत. जालना मतदार संघ महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेला असला तरी तेथून अजित पवार यांच्या पक्षाकडून धैर्यशील अरविंद चव्हाण यांनीही तूर्त अर्ज दाखल केलेला आहे. जालन्यातून धैर्यशील चव्हाण हे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी परत घेतात की कायम ठेवतात, यावर अजित पवारांच्या पक्षाचे बंडखोरीचे चित्र स्पष्ट होईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊपैकी एकही जागा अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेला आलेली नाही. तर नांदेडमधील नऊपैकी केवळ लोह्याची जागा अजित पवारांच्या पक्षाला मिळाली असून, तेथेही भाजपमधून प्रवेश केलेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या पक्षाकडे आलेले असून, त्यामध्ये बीड, परळी, माजलगाव व गेवराईचा समावेश आहे. तर आष्टीत भाजप विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होईल, असे चित्र आहे. तेथे भाजपकडून आमदार सुरेश धस यांना तर अजित पवार यांच्या पक्षाकडून पक्षाचे विद्यामान आमदार बाळासाहेब आजबे यांना ए. बी. फॉर्म देण्यात आलेला आहे.