मधु कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत भाजपशी हात मिळवणी करण्यावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीची दादागिरी काँग्रेसला नवी नाही, परंतु सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी काँग्रसेची अवस्था कालही होती आणि आजही तशीच आहे.

राज्यात १९९९ ते २०१४ असे सलग पंधरा वर्षे सत्तेत असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खाते वाटप असो की निधीवाट असो, कायम ताणाताणी सुरु असायची. आता सत्तेचा रंगमंच बदललेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पात्री सत्ता नाट्यात आता मुख्य भूमिकेत शिवसेना आहे. पूर्वीच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत मुख्य सत्ताधारी पक्ष काँग्रेस असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर कायम आपला वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळीही भंडारा, गोंदिया सारखे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणी कुणाबरोबर युती केला यावरुन कायम खडाखडी सुरु असायची.

अनेक ठिकाणी भाजप व शिवसेनेशी हातमिळवणी करुन दोन्ही काँग्रेस सत्ता उपभोगायचे. लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील  भाजप-शिवसेनेबरोबरच्या युती मोडायचे फतवे दोन्ही काँग्रेसकडून निघायचे. निवडणुका झाल्या की पुन्हा सत्तेसाठी वाट्टेल ते, हे समीकरण वर्षानुवर्षे सुरू होते. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील या जुन्याच वादाचा खुळखुळा आता नव्याने वाजू लागला आहे. निमित्त ठरले ते नुकत्याच पार पडलेल्या भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापतींच्या निवडणुका. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसने राष्ट्रवादीशी युती करण्याऐवजी भाजपमध्ये फूट पाडून बंडखोर गटाशी हातमिळवणी करुन अध्यक्षपद पटकावले. उपाध्यक्षपद अर्थातच भाजपच्या बंडखोर गटाकडे गेले, त्यामुळे सत्तेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या राष्ट्रवादीने बाजुच्याच गोंदिया जिल्हा परिषदेत थेट भाजपशीच हातमिळवणी करुन काँग्रेसला जोराचा झटका दिला. त्यावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठित खंजीर खुपसला असा कांगावा करीत, त्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले. त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोलींनी पाठिंत खंजीर खुपसला असे भाजपने म्हणावे का, असा सवाल करीत,  गोंदिया जिल्हा परिषदेमधील भाजपशी हातमिळवणी करण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयाचे एक प्रकारे समर्थनच केले.  त्याही पुढे जाऊन मागील काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे तत्कालीन आमदार गोपालदास आग्रवाल आणि नाना पटोले यांनी भाजपबरोबर किती वेळा हातमिळवणी केली, याची राष्ट्रवादीने छोटेखाणी श्वेतपत्रिकाच जाहीर केली. चुका काँग्रेसच्या आहेत, मग राष्ट्रवादीने असा एखादा झटका दिला की, त्यावर आदळआपट करण्यापलिकडे काँग्रेस काय करणार ? अशी चर्चा या निमित्ताने सर्वत्र सुरू आहे