हर्षद कशाळकर
रायगड जिल्ह्यात कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. सिडकोला धरण हस्तांतरीत करण्यात माजी आमदार सुरेश लाड यांनी विरोध दर्शविला आहे. आधी कर्जतकरांना पाणी द्या आणि उरलेले पाणी सिडकोला द्या अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपलाही स्थानिकांना पाणी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळावा लागला असून त्यातून शिवसेनेची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
उल्हास नदीवर कोंढाणे चोची परीसरात २०११ साली या धरणाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. कर्जत, नेरळ आणि लगतच्या परीसरातील पाणी प्रश्न सुटावा, शेती सिंचनाखाली यावी यासाठी हा या धरणाच्या उभारणी मागचा मुळ उद्देश होता. पूर्वी जलसंपदा विभागामार्फत या धरणाची निर्मिती केली जाणार होती. मात्र धरणाच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि धरणाचे काम थांबले होते. यानंतर हे धरण आता सिडकोच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकाळात घेण्यात आला. आता पुन्हा एकदा हे काम जलसंपदा विभागामार्फत केले जावे असा सूर सुरेश लाड यांनी लावला आहे. त्यामुळे कोंढाणे धरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
माथेरानच्या पायथ्याशी यापूर्वी मोरबे धरणाची निर्मिती जिवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आली होती. स्थानिकांना पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र नंतर राज्य सरकारने हे धरण नवीमुंबई महानगरपालिकेला दिले. आज धरणाच्या पायथ्याशी असलेली गावे पाण्यासाठी संघर्ष करतांना दिसत आहेत. कर्जत तालुक्यातील पाली भुतवली धरणाची उभारणीही शेतजमीन सिंचनाखाली यावी यासाठी झाली होती. पण कालव्यांची कामे झालीच नाहीत. त्यामुळे धरण उभारण्याचा उद्देश साध्य होऊ शकलेला नाही. पेण तालुक्यातील हेटवणे धरणाची निर्मितीही सिंचनासाठी करण्यात आली होती. धऱणाच्या उभारणीनंतरही कालव्याची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. धरणाचे पाणी नवी मुंबईकडे वळविण्यात आले. तर पेणमधील अनेक गावे पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. आता पेणमध्ये होऊ घातलेल्या बाळगंगा आणि कर्जत मधील कोंढाणे प्रस्तावित धरणाचे पाणी नवी मुंबईत वळवले जाणार आहे. जिल्ह्यात धरण प्रकल्पांना विरोध होण्याचे हे मुख्य कारण आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी स्थानिकांच्या पाण्यावरील हक्काचा मुद्दा उपस्थित केल्याने राजकीय वळण मिळाले. मोरबे धरणाच्या वेळेस जे झाले त्याची पुनरावृत्ती कोंढाणे धरणाच्या निमित्ताने होऊ नये. धरणातील पाण्यावर स्थानिकांचा पहिला हक्क असायला हवा, त्यानंतर उरलेले पाणी नवी मुंबईला द्यायला हवे अशी आमची मागणी आहे, असे सुरेश लाड यांनी म्हटले आहे. स्थानिक जनतेची नाराजी नको यासाठी भाजपनेही लाडांच्या सूरात सूर मिसळला आहे. धरणाची निर्मिती ज्या उद्दीष्टासाठी होणार आहे. ते उद्दिष्ट साध्य व्हायला हवेच. मात्र त्याच वेळी पाण्यावर स्थानिकांचा अधिकार कायम राहायला हवा. धरणाचे पाणी स्थानिकांना मिळायलाच हवे अशी भूमिका भाजप नेते देवेंद्र साटम यांनी घेतली आहे. शिवसेनेनी याबाबत कुठलीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. पण लाड यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.