दिशा काते
मुंबई : गोकुळाष्टमीपासून सुरू झालेला सण साजरे करण्याचा राजकीय सोस आता दिवाळीच्या मुहूर्तावर अधिकच वाढला आहे. उटणे वाटप, फराळ वाटप, दीपोत्सव यांच्याबरोबरच सध्या आपापल्या नेत्यांचे चेहेरे, पक्षाचे चिन्ह असलेले आकाशकंदील लावण्याची अहमहमिका सध्या सर्व राजकीय पक्षांत सुरू आहे.
राज्यातील अटीतटीच्या राजकीय संघर्षाचा परिणाम सण-उत्सवांवर प्रामुख्याने झालेला दिसत आहे. शहरातील, उपनगरातील प्रत्येक चौक, रस्ता, महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे येथे लागलेले मोठमोठे कंदील लक्षवेधक ठरत आहेत. प्रामुख्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप यांच्याजोडीने या स्पर्धेत यंदा बाळासाहेबांची शिवसेनाही आघाडीवर आहे. मनसेनेही आपले अस्तित्व मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी मोठमोठ्या कंदिलांचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेकांचे कंदील भगवेच आहेत. एखाद्या पक्षाचा कंदील लागल्यावर त्याच्या जवळपासच आपल्या पक्षाचा कंदील लागावा याची आवर्जून काळजी घेताना दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते दिसत आहेत.
हेही वाचा : मनसेचेही मिशन बारामती : गाव तिथे शाखा
दादर, वरळी, परळ, शीव येथे मोठमोठे कंदिल राजकीय पक्षांनी लावले आहेत. शिवसेनेचा वरचष्मा असलेल्या दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचे कंदील अधिक आहेत. झुंबर आणि इतर रोषणाईदेखील आकर्षणाचा भाग बनला आहे. ही तयारी मनसेच्या दीपोत्सवाची असल्याचे दिसून येते अगदी दादर स्थानकापासून मनसेचे कंदील लागलेले पाहायला मिळतात या कंदिलांवर राज ठाकरे, अमित ठाकरे आणि त्याचबरोबर मनसेच्या नगरसेवकांचे फोटो दिसून येतात.
हेही वाचा : अंधेरीतील भाजपची माघार : पराभवाची भीती आणि विजयाचे हिशेब
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेदेखील कंदील दादर स्थानकापासून पाहावयास मिळतात या कंदिलांवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्याचबरोबर भाजपने कंदील लवतानाही शिवडी, वरळीवरील लक्ष कमी केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत.