अविनाश कवठेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्यातील वाढती जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली असली तरी ब्राह्मण महासंघाने निमंत्रण नाकारल्याने त्या बैठकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी असलेली राष्ट्रवादीची सलगी, २०१९ मध्ये पवारांनी पुणेरी पगडीला विरोध करत फुले पगडीचा केलेला पुरस्कार यापासून ते आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुरोहितांची केलेली नक्कल अशा विविध घटनांमुळे शरद पवार यांचा ब्राह्मणविरोधी राजकारणाशी संबंध जोडला जात असून त्यातूनच हा विसंवाद तयार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्यातील ही तेढ दूर कऱण्यासाठी ब्राह्मणांशी संवादासाठी थेट शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही काळापासून शरद पवार हे ब्राह्मण विरोधक असल्याचा आक्रमक प्रचार हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू झाला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केल्याचा व ब्राह्मणांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप गेल्या काही सभांमध्ये वारंवार केला. त्यातूनच समाजमाध्यमांवर ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, द्वेषपूर्ण मजकूर लिहितात व त्यातूनच केतकी चितळे प्रकरण घडल्याचे चित्र आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच शरद पवार ब्राह्मण विरोधी असल्याच्या समजाबाबत थेट ब्राह्मण संघटनांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. शरद पवार हे थेट चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालय येथे शनिवारी, सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या बैठकीला २० ते २२ ब्राह्मण संघटना उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बैठकीला येणाऱ्यांना आपल्याबरोबर पेन आदी वस्तू आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या बैठकीनंतर राज्यातील तणावपूर्ण वातावरण निवळेल, असा दावा प्रदीप गारटकर यांनी केला. ब्राह्मण महासंघाने मात्र बैठकीचे निमंत्रण नाकारले असून मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत शरद पवार यांनी आधी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली. त्यामुळे या बैठकीत काय होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदासस्वामी नव्हते याबाबतचे विधान, दादोजी कोंडदेव यांचे लाल महालातील शिल्प हटविण्याचा वाद, राम गणेश गडकरी पुतळ्याची विटंबना, पुणेरी पगडीऐवजी शरद पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीआधी फुले पगडीचा पुरस्कार केला. तसेच भाजपने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते याचा संदर्भ घेत छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत असत आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले, असे सूचक विधान शरद पवार यांनी केले होते. त्यावेळीही ब्राह्मण समाजात नाराजी उमटली होती. ब्राह्मणविरोधी अशी प्रतिमा असलेल्या संभाजी ब्रिगेडबाबतची पवार यांची मवाळ भूमिका आदींबाबत ब्राह्मण संघटनांनी आक्षेप नोंदविले होते. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मणांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून ब्राह्मण संघटनांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण संघटनांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते.

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर

या पार्श्वभूमीवर ब्राह्मण महासंघाने बैठकीचे निमंत्रण नाकारले आहे. केतकी चितळेवर २८ ठिकाणी गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांनी मिटकरी यांच्याविरोधात एकही गुन्हा का दाखल केला नाही, असे सांगत महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी बैठकीला महासंघाचा कोणताही पदाधिकारी जाणार नसल्याची भूमिका घेतली. ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरही पवार यांच्या पक्षाकडून व संबंधित संघटनांकडून गेल्या काही वर्षांत सातत्याने टीका केली आहे. राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतात हे चुकीचे आहे, असे दवे यांचे म्हणणे आहे. तर राजकीय पक्ष समाजातील प्रत्येक घटकाबरोबर काम करत असताे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काहीसे दूषित झाले आहे. राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनातील गैरसमज दूर करणे हा या बैठकीचा उद्देश आहे, असे प्रदीप गारटकर यांचे म्हणणे आहे. या सर्व पूर्वेतिहासामुळेच पवार-ब्राह्मण विसंवाद तयार झाला असून तोच दूर करण्यासाठी आता खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.