मुंबई: मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि सगेसोयरेबाबतची अधिसूचना अंतिम करावी या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी सविस्तर चर्चा झाली. साखर कारखान्यांना मदत करताना विरोधकांच्या कारखान्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याची तक्रार करतानाच दूध दराच्या प्रश्नाची लवकर सोडवणूक करण्याची मागणी पवार यांनी शिंदे यांच्याकडे केली.
मराठा आरक्षण तसेच दूध उत्पादकांचे वाढीव दरासाठी सुरू असलेले आंदोलन आणि साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांवरून पवार यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी पवार यांची भेट घेऊन मराठा-ओबीसी वादात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्या वेळी या विषयावर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू अशी ग्वाही पवार यांनी भुजबळ यांना दिली होती. त्यानुसार ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा >>> ‘मंत्रालय, राजभवनासमोर फेरीवाले चालतील का?’
मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देतांना सगेसोयरेबाबत सरकारने काढलेली अधिसूचना अंतिम करावी, तसेच मराठा कुणबी असल्याच्या ५७ लाख नोंदी सापडल्या असून त्याच्या आधारे मराठा आणि कुणबी एकच असल्याचे आणि या समाजास इतर मागार प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यानी लावून धरली आहे. सगेसोयरेबाबतच्या अधिसूचनेवरील हरकतींवर १३ जुलै पूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र त्याची अंमलबजाणी झाली नसल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे. त्याबाबत शिंदे आणि पवार यांच्याच विचारविनिमय झाल्याचे समजते.
त्याचप्रमाणे राज्यातील साखर उद्याोगाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकाच्या हमीवर राष्ट्रीय सहकार निगमकडून राज्यातील साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र यातून विरोधकांच्या कारखान्यांना जाणून बजून वगळले जात असून त्याबाबत लक्ष घालावे.
दूध उत्पादक संघर्ष समितीची भेट
या वेळी पवार यांच्या समवेत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डॉ. अजित नवले, विनोद देशमुख, अभिजित देशमुख, बबलू देशमुख, प्रकाश देशमुख व नामदेव साबळे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.दुधाला ४० रुपये भाव मिळावा, दुधाला एफ.आर.पी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दूध भेसळ थांबावी, पशुखाद्याचे दर कमी करावेत आदी मागण्या या वेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. त्यावर या प्रश्नात लक्ष घालून निर्णय घेण्याची ग्वाही शिंदे यांनी शिष्टमंडळास दिली.