जयेश सामंत
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांच्यावर खरमरीत टिका करत ठाण्यातील राजकारणात माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची बाजू नेटाने लावून धरणारे राष्ट्रवादी काॅग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून थेट सत्तेच्या बाजूने उडी घेतल्याने ठाण्यात शिंदे गटाची मोठी कोंडी झाली आहे. शिंदे यांच्याकडे थेट मुख्यमंत्री पद आल्याने ठाण्यातील विरोधी पक्षांचे नेते गेल्या काही महिन्यांपासून सावध भूमीकेत आहेत. शिंदे पिता-पुत्रांवर टिका केल्यास एखाद्या चौकशीचा अथवा गुन्ह्याचा ससेमिरा मागे लागायचा या भीतीने हातचे राखून बोलण्या-वागण्याकडे या नेत्यांचा कल दिसतो. असे असताना परांजपे मात्र संधी मिळताच शिंदेवर प्रहार करताना दिसायचे. ठाण्यातील राजकारणात आव्हाडांचे ‘नेमबाज’ अशी ओळख प्रस्थापित करणारे परांजपे येत्या काळात मात्र सत्तेच्या खुर्चीत दिसणार या विचारानेच शिंदे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.
जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनीच आनंद यांना बोट धरुन राजकारणात आणले. राष्ट्रवादी काॅग्रेसचे तेव्हाचे मातब्बर नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव यांचा ९० हजार मतांनी पराभव करुन परांजपे यांनी पोटनिवडणुकीत बाजी मारली. त्यानंतर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेत शिंदे यांनी परांजपे यांना कल्याण या नव्या लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरविले. शिंदे म्हणतील ती पुर्वदिशा या न्यायाने वागणारे परांजपे यांनी याठिकाणी वसंत डावखरे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारास २००९ मध्ये पराभवाची धुळ चारली. खासदार म्हणून शिंदे यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे परांजपे त्यांचे मानसपुत्र म्हणूनही ओळखले जात. ठाणे महापालिकेच्या २०१२ मधील निवडणुकी दरम्यान परांजपे यांनी शिंदे आणि शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आपण ज्याला मुलाप्रमाणे वागविले त्याने केलेला दगा तेव्हा शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता. एरवी सर्वसमावेशक राजकारणासाठी ओळखले जाणारे शिंदे यांनी तेव्हापासून परांजपे यांना मात्र चार हात दूर ठेवले. २०१४ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुलगा श्रीकांत यांना रिंगणात उतरवित शिंदे यांनी परांजपे यांचे उट्टे काढले. पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परांजपे ठाणे लोकसभा मतदारसंघातून रिंगणात होते. तेव्हा मोदी लाटेत त्यांना चार लाखांहून अधिक मतांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. शिंदे यांच्याविरोधात केलेल्या बंडाला ११ वर्ष होत आली तरी शिंदे आणि परांजपे यांच्यात अजूनही संवाद नाही. इतकी ही कटुता टोकाची आहे.
हेही वाचा >>>आधी फारसे सख्य नसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अजित पवारांशी सूर जुळले कसे ?
परांजपे अजितदादांच्या गटात, शिंदे समर्थक नाराज
गेल्या काही वर्षात परांजपे हे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या गोटातील मानले जात. ठाणे शहरातील पक्षांतर्गत राजकारणात आव्हाड यांनी परांजपे यांनी पुर्ण सुट दिली होती. पक्षानेही त्यांना मध्यंतरी प्रवक्ते पदाची संधी देऊ केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच परांजपे यांच्याकडे ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांच्या समन्वयक पदाची जबाबदारी पक्षाने सोपवली होती. या संपूर्ण पट्टयातील निवडणुकांचे नियोजनाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र राज्यात सत्ताबदल होताच खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक राजकारण करत आव्हाड यांची मिळेल तेथे नाकाबंदी करायची रणनिती अवलंबली. या काळात आव्हाडांची बाजू लावून धरत शिंदे पिता-पुत्रांविरोधात आक्रमक टिका करण्यात परांजपे आघाडीवर दिसायचे. ठाणे महापालिकेतील नियुक्त्या तसेच कंत्राटी कामांमधील कथीत भ्रष्टाचार, वाढती बेकायदा बांधकामे, पोलिसांमार्फत राबविले जाणारे दबावतंत्राविरोधात परांजपे अनेकदा थेट मुख्यमंत्र्यांविरोधात आरोप करताना दिसले. त्यामुळे आव्हाडांसोबत परांजपे हे देखील अनेकदा शिंदे गटाच्या रडारवर येत. दोन दिवसांपुर्वी अजितदादांचा हात धरुन परांजपे यांनी थेट सत्तेच्या बाजूने उडी घेतल्याने आता याच परांजपेसोबत ठाण्यात मात्र कसे जुळवून घ्यायचे असा सवाल शिंदे समर्थकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रवक्ते या नात्याने एरवी टिकेच्या टोकावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची बाजू घेण्याची वेळही कदाचित परांजपेवर येऊ शकते. याविषयी परांजपे यांच्याशी वारंवार सपर्क साधायचा प्रयत्न करुनही तो होऊ शकला नाही.
हेही वाचा >>>केरळमध्ये समान नागरी कायद्याचा विरोध करण्यासाठी सत्ताधारी सीपीआय (एम) पक्ष सरसावला, राज्यव्यापी शिबिर घेणार
गेल्या काही काळात मुख्यमंत्र्यांवर टिका करताना आव्हाडांपेक्षा परांजपे यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्याचे आम्ही पाहीले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या ठाण्यातील समर्थकांशी भलेही आम्ही जुळवून घेऊ मात्र परांजपे यांच्याशी गट्टी कशी जमवायची हा सवाल आम्हाला सतावतो आहे.-मुख्यमंत्री समर्थक ज्येष्ठ नगरसेवक.