मालेगाव – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे असलेल्या धुळ्याच्या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघात तुलनेने काँग्रेसपेक्षा अधिक असलेले प्राबल्य आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पाठबळ या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा भाजपकडून खेचून आणण्यात नक्की यशस्वी होऊ शकतो, असा युक्तीवाद या संदर्भात केला जात आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, सटाणा, शिंदखेडा, धुळे शहर व धुळे ग्रामीण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मालेगावातील उपरोक्त दोन्ही विधानसभा मतदारसंघ पूर्वी दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात समाविष्ट होते. परंतु मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ पासून मालेगावचे दोन आणि शेजारील सटाणा असे तिन्ही मतदारसंघ धुळे या सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघात समाविष्ट केले गेले. या मतदारसंघाचा भाग पूर्वी खास करून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असे. मात्र भाजपचे प्रतापदादा सोनवणे हे २००९ मध्ये या ठिकाणी कमळ फुलविण्यात यशस्वी झाले होते. काँग्रेसचे तत्कालीन मोठे नेते अमरिश पटेल यांना त्यांनी धूळ चारली होती.
हेही वाचा – वर्ध्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत सभापतीपदावरून बिनसले
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेपुढे निभाव न लागलेल्या काँग्रेसच्या पराभवाची पुनरावृत्ती झाली. या निवडणुकीत भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे तब्बल एक लाख ३० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसच्या अमरिश पटेल यांच्यावर सलग दुसऱ्यांदा पराभवाची नामुष्की ओढवली. २०१९ मध्ये भाजपचे डाॅ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात सामना रंगला. प्रारंभी अटीतटीची वाटणारी ही लढत अंतिमत: एकतर्फीच झाल्याचे बघावयास मिळाले होते. डाॅ. भामरे यांनी तब्बल दोन लाख ३० हजार असे घसघशीत मताधिक्य घेत पाटील यांच्यावर मात केली होती.
अशा तऱ्हेने काँग्रेस उमेदवारांचा सलग तीन वेळा पराभव झाला. त्यात अन्य पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे दिसून आले तरी मुस्लीमबहुल मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रत्येक वेळी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकल्याचा इतिहास आहे. २०१४ च्या निवडणुकीत सव्वा लाखावर आणि गेल्या वेळच्या निवडणुकीत तेथून जवळपास एक लाख ३५ हजारांचे मताधिक्य काँग्रेसने भाजपवर मिळवले होते. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बऱ्याच ठिकाणी काँग्रेसला गळती लागल्याचे दिसून आले.
हेही वाचा – भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्रावरच लक्ष केंद्रित
धुळ्यातून काँग्रेसकडून दोनदा निवडणूक लढविलेले अमरिश पटेल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष पिछाडीवर राहत असताना लोकसभा निवडणुकीत मालेगावमधून प्रत्येक वेळी घसघशीत आघाडी देण्याची कामगिरी करणारे मालेगावचे माजी आमदार असणारे शेख रशीद आणि आसिफ शेख या पिता-पुत्रांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दीड वर्षांपूर्वी हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले आहे. या पिता-पुत्रांसमवेत मालेगावातील काँग्रेसचे तब्बल २८ नगरसेवक तेव्हा एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे मालेगावात काँग्रेस पक्ष अत्यंत क्षीण झालेला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर प्रमुख आसिफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली येथे नुकत्याच पार पडलेल्या पक्ष बैठकीत धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा आता काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढविण्यात यावी, असा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते रशीद शेख यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रहदेखील बैठकीत धरण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटप सूत्रानुसार तीन वेळा पराभव झालेल्या जागा परस्पर सहमतीने अदलाबदल करण्याचे धोरण असण्याकडे बैठकीत अंगुलीनिर्देश करण्यात आला. सद्य:स्थितीत धुळे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एमआयएम आणि भाजपचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेस, शिंदे गटाचे प्रत्येकी एक असे आमदार आहेत. गतवेळी भाजपबरोबर असलेली शिवसेना (ठाकरे गट) आता काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर असल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. अशा वेळी धुळ्याच्या जागेची अदलाबदल केल्यास भाजपला पराभूत करणे सुलभ होईल, असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दबाव तंत्राचा वापर सुरू झाल्याचेही अधोरेखित होत आहे.