कोल्हापूर : शरद पवार यांच्या सभेनंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तेथेच सभा घेण्याच्या अजित पवार गटाच्या योजनेनुसार येत्या रविवारी कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. शरद पवारांपेक्षा अजित पवारांची सभा अधिक मोठी करण्याचा प्रयत्न स्थानिक नेते हसन मुश्रीफ यांनी सुरू केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर कोल्हापुरात झालेल्या पहिल्या सभेत शरद पवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार अशा तिन्ही पिढ्यांनी दुरावलेले स्थानिक नेते हसन मुश्रीफ यांना टीकेचे लक्ष्य केले. त्यातील आव्हाड, रोहित पवार यांच्याशी मुश्रीफ यांचा शाब्दिक वाद कोल्हापुरातून थेट बीडपर्यंत जाऊन पोहोचला. तर शरद पवार यांच्या बाबतीत मात्र वाद टाळण्याची भूमिका मुश्रीफ घेताना दिसले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुभंग झाल्याने शरद पवार यांनी येवला येथे पहिली सभा घेत छगन भुजबळ यांच्यावर बोचरे भाष्य केले होते. बीड येथील दुसऱ्या सभेत धनंजय मुंडे यांना यांच्या तोडीस तोड उमेदवार पुढे आणला. कोल्हापूरमध्ये सभा होत असताना शरद पवार आपले पूर्वीचे खंदे समर्थक मुश्रीफ यांच्याबाबत कोणती भूमिका घेणार याची चर्चा होती. सभेत भाषण संपतेवेळी शरद पवार यांनी मुश्रीफ यांना लक्ष्य केले. ‘ईडीची नोटीस आल्यानंतर अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्याप्रमाणे ते सामोरे जातील असे वाटत होते. पण त्यांनी सत्तेची सोबत केली. घरच्या महिलांनी जे धाडस दाखवले; ते कुटुंबाचे प्रमुख दाखवू शकले नाहीत,’ असे म्हणत मुश्रीफ यांच्या नमते घेण्याच्या भूमिकेवर टीका केली. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेतही याच मुद्द्यावरून त्यांनी मुश्रीफ यांना धारेवर धरले. इतके करूनही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘नो कमेंट्स’ असे म्हणत पवार यांना भिडण्याचे टाळत त्यांच्याविषयीचा आदरभाव आजही कायम असल्याचे दाखवून दिले. उलट, ‘४० वर्षांनंतर शरद पवार कोल्हापुरात येऊनदेखील आमची भेट होणार नाही. परिस्थितीप्रमाणे मी त्यांच्यासोबत नाही,’ असे सांगत ते भावूक झाले होते.
आव्हाड – मुश्रीफ सामना
राष्ट्रवादी एकत्रित असताना हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मैत्रीचे नाते होते. पक्ष फुटल्यानंतर दोघांतील संबंध बिनसले असल्याचे दोनदा पाहायला मिळाले. कोल्हापुरातील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांचा उल्लेख वस्ताद असा करून ते उस्ताद यांना (हसन मुश्रीफ) भेटायला आले आहेत . या सापांना चेपण्यासाठी कोल्हापुरी पायतानाचा वापर करावा लागेल ‘, असा टोला आव्हाड यांनी मुश्रीफ याना लगावला होता. त्याच भाषेत मुश्रीफ यांनी पलटवार केला. ‘सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिले होते; त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचीही सही होती, असा उल्लेख करतानाच मुश्रीफ यांनी ‘कोल्हापुरात कापशीचीही चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की त्यांना कळेल,’ असे जहाल प्रत्युत्तर दिले. दोघांतील वाद बीडच्या सभेमध्ये पुन्हा चर्चेला आला. ‘अजित पवार यांनी कोणावर टीका करायची नाही असे स्पष्ट केले असताना आव्हाड यांनी आमच्यावर गद्दार, गद्दारांचे रक्त, साप बिळातून बाहेर आले अशी भाषा केल्याने राग अनावर होऊन मी कापशी चप्पलेच उल्लेख केला होता. आव्हाड यांनी एका प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरले होते,’ असा गौप्यस्फोट केला. त्यावर आव्हाड यांनी ‘मुश्रीफ, कुराणावर हात ठेवून सांगा. मी कोणाचे पाय धरले होते?’, अशी विचारणा करीत वाद आणखी ताणवला आहे.
कोल्हापुरात शरद पवार यांची सभा होण्याआधीपासून या गटाने मुश्रीफ यांच्यावर बरसण्याची तयारी केली असावी अशी नेपथ्यरचना दिसत होती. शरदनिष्ठांना अचानक मुश्रीफ यांच्यातील दुर्गुण दिसायला लागले. पहिल्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी ‘मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास होतो,’ असा जिव्हारी हल्ला चढवला होता. ‘टीका करण्यास काही जागा नसल्याने असे नसते मुद्दे उपस्थित केले जात आहेत. रोहित पवार अजून लहान आहेत. त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. त्यांनी कुटुंबातील वाद मिटवायला हवेत; वाढवायला नकोत, असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला. तरीही सभेवेळी रोहित पवार यांनी ‘मी राजकारणात जागा घेण्यासाठी आलो नाही. तर शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना भाजपकडून संपवण्याचे काम केले जात असल्याने ते उंचीवर नेण्यासाठी काम करत आहे, असे प्रत्युत्तर दिले. यातून तिसऱ्या पिढीतही शाब्दिक वाद रंगलेला दिसला.
दसरा चौक विरुद्ध तपोवन मैदान
शरद पवार यांच्या सभेपाठोपाठ कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन येत्या रविवारी केले असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. सुरुवातीला सभेला ५० हजार लोकांची उपस्थिती राहील असे सांगितले होते. पण चार दिवसांत हा आकडा लाखावर पोहोचला आहे. मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील दसरा चौक या सभेच्या छोट्या आकाराच्या ठिकाणावरून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाला डिवचले होते. अजित पवार यांच्या तपोवन मैदान हे दसरा चौकापेक्षा खूपच मोठे आहे. असे हे मैदान गर्दीने फुलवून या सभेच्या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे. या सभेत शरद पवार आणि त्या गटाबद्दल अजित पवार, हसन मुश्रीफ कोणते भाष्य करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.