आसाराम लोमटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परभणी: राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जाहीर केला होता. त्यानंतर काही काळ लोटला. थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या आमदार बाबाजानी यांनी अखेर अजित पवारांच्या गटात प्रवेश केला असून या गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांना नियुक्ती मिळाली आहे. स्वतःच्या गटाकडे परभणीचे पालकमंत्रीपद घेतल्यानंतर पुन्हा आमदार बाबाजानी यांना आपल्या गटात घेऊन अजित पवार यांनी थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीला मोठाच धक्का दिला आहे. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत स्थानिक नेत्यांची गर्दी झालेली असली तरी या सगळ्यांमध्ये भविष्यात कितपत एकवाक्यता राहील याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

एकेकाळी गंगाखेड, पाथरी, जिंतूर या तीन विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. आज जिल्ह्यातली एकही विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही, तरीही स्थानिक पातळीवर वेगवेगळी सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या नेत्यांची गटबाजी हे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जुनेच दुखणे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर परभणी जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची विभागणी दोन गटात झाली. पक्षफुटीचा संदर्भ जरी या विभागणीमागे असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात असलेली पक्षांतर्गत गटबाजी हेही या विभागणीचे एक महत्त्वाचे कारण आहे. शिवाय थोरल्या पवारांमागे जायचे की धाकल्या हे ठरवताना आगामी राजकीय दिशा आणि समीकरणे याचा विचार स्थानिक नेत्यांनी केला. राष्ट्रवादीतल्या पक्ष फुटीनंतर बाबाजानी यांनी काही काळ थोरल्या पवारांसोबत घालवला पण भविष्यातला विचार करून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला. त्यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्रही देण्यात आले.

आणखी वाचा-नांदेडमध्ये नातेसंबंधांची एक वीण घट्ट तर दुसरी उसवली!

पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद आपल्याला आता नको, हे पद एखाद्या तरुण कार्यकर्त्याला द्यावे असे मत दीड वर्षांपूर्वी बाबाजानी यांनी व्यक्त केले होते. २०२२ च्या मार्च महिन्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी बाबाजानी काँग्रेसच्या वाटेवर होते पण भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या विजय गव्हाणे यांनी बाबाजानी यांना थोपवले. कालांतराने बाबाजानी यांच्या राजीनाम्यावर पडदा पडला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्षांतर्गत गटबाजी दूर करण्यासाठी थेट पक्षनेतृत्वाने कान टोचले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व स्थानिक नेत्यांना एकदिलाने राहण्याच्या सूचना केल्या होत्या.अर्थात या बैठकीनंतरही राष्ट्रवादीतील गटबाजी संपली नव्हतीच. पक्षात फूट पडल्यानंतर खासदार श्रीमती फौजीया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय गव्हाणे, विजय भांबळे हे शरद पवारांसोबत तर शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे तिघे अजित पवारांच्या गोटात दाखल झाले. आपली बांधिलकी कोणत्या गटाशी ठेवायची हा विचार करताना या नेत्यांनी नेत्याच्या एकनिष्ठतेपेक्षा स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार केलेला आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच परभणी जिल्ह्यात या पक्षात मोठी गटबाजी आहे. या गटबाजीत पात्रे बदलतात, गटबाजीचे स्वरूप बदलते, पण ती संपत नाही. श्रीमती फौजिया खान विरुद्ध सुरेश वरपूडकर असा संघर्ष बराच काळ चालला. पुढे वरपूडकरांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.कधी ही गटबाजी विजय भांबळे विरुद्ध बाबाजानी तर कधी राजेश विटेकर विरुद्ध बाबाजानी अशी राहिली. मधुसूदन केंद्रे विरुद्ध बाबाजानी असाही पक्षांतर्गत संघर्ष होता.विटेकर विरुद्ध बाबाजानी यांच्यातल्या संघर्षाची धार मधल्या काळात वाढली होती. या दोघांचेही कार्यक्षेत्र पाथरी विधानसभा मतदारसंघ आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने विटेकर हे अजित पवार यांच्यासोबत गेले पण आता पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विटेकर व बाबाजानी यांच्यात कितपत एकवाक्यता राहील हे लवकरच दिसून येईल.

आणखी वाचा-काँग्रेसकडून ‘वंचित बहुजन’ला हाताच्या अंतरावर ठेवण्याचेच धोरण

सात वर्षे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राहिल्यानंतर आता नव्या व तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीआधी व्यक्त केली होती. पक्ष फुटीनंतर शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख हे अजित पवार यांच्यासोबत तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबाजानी हे शरद पवारांसोबत असे चित्र होते. आता हे दोन्ही जिल्हाध्यक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.

बाबाजानी यांनी गट का बदलला ?

आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून फार आधीपासून ओळखले जातात. पवारांनी १९९९ साली स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष बाबाजानी हेच होते. बाबाजानी यांनी आपल्या गोटात दाखल व्हावे यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. पाथरी येथील साई जन्मभूमी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या मंजुरीसाठी बाबाजानी यांनी सातत्याने पाठपुरावा केला मात्र महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात या आराखड्याला गती मिळाली नाही उलट अलीकडेच मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या आराखड्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. अजित पवार यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळवून घेण्यात बाबाजानी यशस्वी ठरले.

आणखी वाचा-राजस्थानमध्ये भाजपाचा मध्य प्रदेश पॅटर्न! सात खासदार लढवणार आमदारकीची निवडणूक

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून निघून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली. शिंदे यांचे कट्टर समर्थक सईद खान हे पाथरी येथे बाबाजानी यांच्याशी सातत्याने संघर्ष करत आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांना मोठी रसद विकास निधीच्या रूपाने देण्यात आलेली आहे. सईद खान यांच्या विरोधाचा मुकाबला करण्यासाठी बाबाजानी यांनी थेट अजित पवारांचाच गट जवळ केला. ही दोन प्रमुख कारणे बाबाजानी यांच्या या निर्णयामागे आहेत.

मतभेद असलेले एकाच छावणीत

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असताना ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या बाबाजानी व प्रताप देशमुख यांच्यात सख्ख्य नव्हते. राजेश विटेकर व बाबाजानी यांच्यातला संघर्ष अजूनही थांबलेला नाही. दुसरीकडे विटेकर व मधुसूदन केंद्रे यांचे जमत नाही. हे सर्वजण आता अजित पवारांच्या छावणीत आहेत. पाथरीत बाबाजानी विरुद्ध सईद खान यांच्यात सतत आरोप- प्रत्यारोप चाललेले असतात. आता दोघेही सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी आहेत. भविष्यात यांच्यातला संघर्ष चालूच राहणार की मावळणार ही ही कालांतराने स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp district president mla babajani left sharad pawar and join ajit pawars group print politics news mrj
Show comments