मुंबई : थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड चुकीची ठरवणारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच उलटी भूमिका घेत आहेत. एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते ? असा खोचक प्रश्न माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत सभागृहात एकनाथ शिंदे यांना केला.

सरपंच, नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक घेण्यासंबंधीचे विधेयक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मांडले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.

हेही वाचा …तर मग मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून द्या… अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

हेही वाचा… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… विरोधकांच्या ईडी सरकारविरोधात घोषणाबाजी

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच हे विधेयक येणे कसे चूक आहे यासाठी युक्तिवाद केला होता. त्यावेळी त्यांचा उत्साह इतका होता की आम्हीही प्रभावित होऊन त्यांच्या सूचनेला पाठिंबा दिला. त्यांनी इतकी चांगली वकिली केली की देवेंद्र फडणवीसही त्यांना विरोध करू शकले नाही, अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारली.

आज ते पुन्हा सांगत आहेत की थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडायचे त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला.