मोहन अटाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशनकाळासाठी निलंबित करण्‍यात आल्‍यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मवाळ भूमिका घेतल्‍याची चर्चा सुरू झाली आणि नेमक्‍या याच प्रश्‍नावर अजित पवार हे चिडल्‍याचे पहायला मिळाले. यापुर्वीही अनेकवेळा ते पत्रकारांवर रागावल्‍याचे चित्र दिसले. ‘तुम्‍ही मला नको ते प्रश्‍न विचारू नका, नाही तर मी कॅमेरासमोर बोलणे बंद करेन’ असेही काही महिन्‍यांपुर्वी ते संतप्‍त होऊन म्‍हणाले होते. पण, काल-परवा अमरावतीत त्‍यांचा पारा चढल्‍याने अजित पवार का चिडतात, हा सवाल पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे.

विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पहिल्‍या दिवसांपासून वादळी ठरले आहे. त्‍यातच गेल्‍या आठवड्यात विधानसभा अध्‍यक्षांबद्दल अपशब्‍द वापरल्‍याच्‍या कारणावरून जयंत पाटील यांना निलंबित करण्‍यात आले. त्‍यावर विरोधी पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्‍या. पण, अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही, त्‍यामुळे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार नाराज असल्‍याबद्दल कॅमेरासमोर एका पत्रकाराने अजित पवार यांना थेट प्रश्‍न विचारताच ते संतापले. ‘ही बातमी तुम्‍हाला कुणी दिली, पवार साहेबांनी तुम्‍हाला फोन केला होता का, उगाच कंड्या पिकवू नका’ अशा शब्‍दात त्‍यांनी खडसावले.

हेही वाचा: उत्तर महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादीला बळ; शिंदे गटाचीही मुसंडी

गेल्‍या महिन्‍यात अजित पवार हे काही दिवस कुठल्‍याही राजकीय कार्यक्रमात किंवा सार्वजनिक समारंभात दिसले नव्‍हते, तेव्‍हा ते नाराज असल्‍याची चर्चा रंगली. आपण परदेश दौऱ्यावर होतो, तो नियोजित दौरा होता, पण कारण नसताना आपल्‍याला बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न झाला. उगाच काही बातम्‍या चालवायच्‍या, असे म्‍हणत अजित पवार यांनी प्रसार माध्‍यमांना खडे बोल सुनावले होते. पत्रकार हे अजित पवार यांना चालू घडामोडींवर प्रश्न विचारत असतात. कोण काय म्हणाले? कोणी काय राजकीय प्रतिक्रिया दिली? याबाबत अजित पवार यांना पत्रकार प्रश्न विचारतात. त्यामुळे अजितदादा अनेकदा चिडलेले, रागावलेले दिसून येतात. अनेकदा त्‍यांनी पत्रकारांना जाहीर समज दिलेली आहे. तरीही पत्रकार त्यांना तेच प्रश्न विचारतात.

‘पहाटेचा शपथविधी’ हा असाच एक वादग्रस्‍त प्रश्‍न. अजित पवार यांना हा विषय मात्र नकोसा वाटतो. त्‍यांचे यावर एकच उत्‍तर ठरलेले असते. अजित पवार हे यासंबंधीच्या प्रश्नांवर चिडतात, हे अनेकदा अनुभवास आलेले आहे. इतर कोणत्याही विषयावर पत्रकारांच्या प्रश्नांवर भरभरून बोलणाऱ्या अजितदादांना हा प्रश्न मात्र नकोसा वाटतो. त्यांचे नेहमीचे उत्तर ते चिडक्या स्वरात देतात. ते म्हणजे, ‘वेळ आल्यावर बोलेन,’.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्ह्यात कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून राजकीय मशागत

अमरावतीत एका पुरस्‍कार वितरण सोहळ्यातही हा विषय निघालाच. भाजपचे विधान परिषद सदस्‍य प्रवीण पोटे यांनी मिश्किलपणे ‘ शपथविधी सकाळच्या ऐवजी दुपारी झाला असता अजित पवार हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते’, असे वक्‍तव्‍य केले. पण, त्यानंतर मात्र सावध होत ‘हे मी गंमतीने म्हटले आहे. मनावर घेऊन नका. रागावू नका,’ अशी विनंतीही पोटे यांनी अजित पवार यांना केली. एकीकडे, पहाटेच्‍या शपथविधीचा विषय त्‍यांची पाठ सोडायला तयार नाही, अवघड प्रश्‍नांवर त्‍यांचे चिडणे थांबलेले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader ajit pawar seen getting equally angry while talking about jayant patil suspension and many other issues print politics news tmb 01