मुंबई : हसन मुश्रीफ वगळता जुन्या पिढीतील नेत्यांना दूर करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच अडीच वर्षांनंतर सध्याच्या मंत्र्यांना बदलून नवीन चेहऱ्यांचा समावेश करणार हे आजच जाहीर करून पक्षात नाराजी वाढणार नाही याचीही योग्य खबरदारी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या जुन्याजाणत्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. अपवाद केवळ हसन मुश्रीफ यांचा. मुश्रीफ यांना अल्पसंख्याक तसेच कोल्हापूर जिल्ह्यात मिळालेल्या यशानेच मंत्रिमंडळात पुन्हा संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा चेहरा सर्वसमावेशक असावा, असा अजित पवारांचा प्रयत्न आहे. यातूनच विस्तारात समावेश झालेल्या नऊ जणांपैकी तीन जण मराठा तीन ओबीसी समाजाचे असून, उर्विरत तिघांमध्ये अल्पसंख्याक, आदिवासी आणि बंजारा समाजाला प्रत्येकी एक प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.

आणखी वाचा-मंत्र्यांची ओळख : राधाकृष्ण विखे- पाटील, प्रकाश आबिटकर, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्ता भरणे

एकनाथ शिंदे सरकारमधील छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, संजय बनसोड, अनिल भाईदास पाटील, धर्मराव आत्राम या मंत्र्यांचा फेरसमावेश झालेला नाही. आदिती तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांचा पुन्हा समावेश करताना नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, माणिकराव कोकाटे, दत्ता भारणे, मकरंद पाटील या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भुजबळांना का वगळले ?

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांची काहीशी कोंडी झाली होती. भुजबळांनी ओबीसी समाजाची बाजू उचलून धरल्याने मराठा समाजात प्रतिक्रिया उमटली होती. भुजबळ आणि जरांगे यांच्या वादाचा फटका राष्ट्रवादीला बसत असल्याचे पक्षातील नेत्यांचे निरीक्षण होते. याउलट भुजबळांनी ओबीसी समाजाचा पुरस्कार केल्याचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदाही झाला. कारण आतापर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज तेवढा राष्ट्रवादीच्या मागे उभा राहत नसे. तेव्हा राष्ट्रवादीची प्रतीमा ही मराठा समाजाचा पक्ष अशी झाली होती. भुजबळांमुळे हे चित्र बदलणे राष्ट्रवादीला शक्य झाले. भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवून अजित पवारांनी पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंजे, आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात संधी दिली. दिलीप वळसे-पाटील यांना प्रकृती साथ देत नसल्यानेच दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. भुजबळ यांना नारळ देण्यात आला असला तरी मुश्रीफ बचावले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader chhagan bhujbal and dilip walse patil have not been included in cabinet print politics news mrj