संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात नेतेमंडळींना झालेली अटक किंवा छापेमारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वादगस्त ठरला असतानाच लक्षद्विपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहंमद फैझल यांना खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली दहा वर्षांची शिक्षा ठोठावल्याने लोकसभा सचिवालयाने त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरविले आहे. नेतेमंडळींच्या उद्योगांमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे.

दोनच दिवसांपूर्वी सक्तवसुली संचलनालयाने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. माजी मंत्री नवाब मलिक हे अद्याप तुरुंगात आहेत. दुसरे माजी मंत्री अनिल देशमुख यांना अलीकडेच जामीन मंजूर झाला. या साऱ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम होत असतानाच लक्षद्वीपमधील पक्षाचा खासदारच अपात्र ठरल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.

हेही वाचा >>> उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

राष्ट्रवादीचे लोकसभेत पाच खासदार निवडून आले होते. यापैकी चार जण हे महाराष्ट्रातून तर एक जण लक्षद्वीपमधून निवडून आला होता. काँग्रेस नेते व माजी मंत्री पी. एम. सईद यांच्या नातेवाईकावर झालेल्या हल्लाप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार मोहंमद फैझल यांना दोनच दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. नवीन नियमाप्रमाणे कोणत्याही सभागृहाच्या सदस्यासा दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळाची शिक्षा ठोठावण्यात आल्यास लगेचच सदस्यत्व रद्द होते. यानुसार लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादीच्या खासदाराला अपात्र ठरविले आहे. आता या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल. सध्या तरी राष्ट्रवादीच्या खासदारांचे लोकसभेतील संख्याबळ घटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leaders controversial mps are disqualified mp mohammad faisal ten years punishment print politics news ysh