सोलापूर : हिंदू राष्ट्र निर्मितीचा ध्यास घेऊन लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या बंदी आदी कायदे होण्याच्या मागणीसाठी सोलापुरात निघालेल्या हिंदू गर्जना मोर्चाद्वारे संघ परिवाराचे प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना, श्रीराम युवा सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जनजागृती समिती, गोरक्षक संघ आदी संघटना या शक्तिप्रदर्शनात उतरल्या होत्या. या विराट मोर्चात संघ परिवाराशी संबंध नसलेल्या किंबहुना संघ विरोधात भूमिका घेणाऱ्या संघटनांचे नेते सामील झाले तर ते आश्चर्यच होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील सर्वेसर्वा, माजी महापौर महेश कोठे यांचा या हिंदू गर्जना मोर्चातील सक्रिय सहभाग आश्चर्यचकित करणारा ठरला. त्यामुळे महेश विष्णुपंत कोठे हे आता नेमके ‘कोठे’ आहेत ? त्यांची राजकीयदृष्ट्या विश्वासार्हता काय, याची पुन्हा प्रश्नार्थक चर्चा सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता राष्ट्रवादी काँग्रेसची कोठे यांच्याविषयी काय भूमिका राहणार आहे, याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे दिवंगत विश्वासू सहकारी विष्णुपंत कोठे यांचे महेश कोठे हे पुत्र. यापूर्वी वर्षानुवर्षे सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना सुमारे २५ वर्षे याच कोठे कुटुंबीयांच्या हाती महापालिकेच्या तिजोरीची चावी होती. सुशीलकुमार शिंदे हे राज्यात व केंद्रात सत्तेवर असताना कोठे कुटुंबीय तब्बल चार दशके सत्तेच्या सावलीत राहून मोठे झाले. २००९ नंतर शिंदे व कोठे यांच्यात दुरावा स्पष्टपणे समोर आल्यानंतर कोठे कुटुंबीयांची राजकीय वाट बदलली आणि महेश कोठे हे शिंदे कुटुंबीयांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेत गेले. परंतु दोनवेळा विधानसभा निवडणुका लढवूनही कोठे यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यापुढे टिकाव लागला नाही. शिवसेना उपयोगाची नाही म्हटल्यावर महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग पत्करला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आपले शिष्य सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरातील राजकारण यापूर्वी कोठे कुटुंबीय कसे पाहात होते, हे चांगलेच माहीत होते. तेव्हा शरद पवार यांनी सोलापुरात राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला काडीचा आधार ठरावा म्हणून महेश कोठे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविली. विशेषतः आगामी महापालिका निवडणूक कोठे यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णयही पवार यांनी दिलेला. परंतु, कोठे हे एवढे चलाख की ते राष्ट्रवादीत महत्व मिळवूनदेखील तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत कधीच प्रवेश केला नाही.
अलीकडे राज्यात राजकीय समीकरणे बदलून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. तेव्हा इकडे महेश कोठे यांची भूमिकाही गोंधळात सापडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणास विधान परिषदेवर संधी देण्याचे मान्य केले आहे. जो पक्ष आपणास आमदार करील, त्या पक्षात आपण जाणार असल्याचे कोठे यांनी जाहीरच करून टाकले. दरम्यान, कोठे यांनी यापूर्वी काँग्रेसमधील काही प्रमुख स्थानिक नेत्यांना सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून फोडून राष्ट्रवादीत आणले होते, तसे त्यांनी बदलत्या राजकीय वाऱ्याचा अंदाज घेऊन आपले काही सहकारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पाठविले. त्यापैकी अमोल शिंदे यांना तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुखपद मिळाले. तरीही पुढे विधान परिषदेवर स्वतःची वर्णी कधी लागणार, हे स्पष्ट होत नसल्याने कोठे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. सद्यस्थितीत ते राष्ट्रवादीची सूत्रे हाताळत असले तरी त्यांच्या एकूणच राजकीय विश्वासार्हता आणि स्पष्ट भूमिकेविषयी संदिग्धताच आहे. तरीही राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींनी एका मर्यादेत राहून महेश कोठे यांचे महत्व अधोरेखित केले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा महेश कोठे यांची विश्वासार्हता आणि वैचारिक राजकीय भूमिका प्रश्नार्थक चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचा प्रथम क्रमांकाचा शत्रू असलेल्या संघ परिवाराच्या हिंदू गर्जना मोर्चात कोठे हे हिरीरीने सहभागी झाले होते. डोक्यावर भगवी टोपी आणि खांद्यावर भगवे उपरणे घालून निष्ठावंत हिंदुत्ववादी नेत्यासारखे कोठे हे हिंदू गर्जना मोर्चाच्या गर्दीत सहभागी होताना दिसून आले. राष्ट्रवादीत असूनही त्या पक्षाच्या धोरणाच्या अगदीच विसंगत अशा संघ परिवाराच्या शक्तिप्रदर्शनात कोठे यांचा सहभाग दिसून आला. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशी राजकीय वाट तुडविल्यानंतर आता थेट संघ परिवाराच्या तंबूत प्रवेश करण्याची महेश कोठे यांची कृती पुन्हा एकदा विश्वासार्हतेच्या फेऱ्यात सापडली आहे. मुख्य म्हणजे आता महेश कोठे यांच्याविषयी राष्ट्रवादीची काय भूमिका राहणार, हे लगेचच स्पष्ट झाले नाही. पण राष्ट्रवादीला आता स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे, हे मात्र निश्चित.