पुणे : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबई म्हणजे, महानंदची पंचवार्षिक निवडणूक अपवाद वगळता बिनविरोधच झाली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असतानाही सरकारी पातळीवरून मदत व्हावी आणि महानंद अडचणीतून बाहरे यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे महानंदची सर्व सूत्रे दिली होती. त्यामुळे, महानंदच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे यांना आपले सख्खे मेहुणे राजेश परजणे यांची वर्णी लावता आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानंदवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कायम वर्चस्व राहिले आहे. आता महानंद अडचणीत आला असून. दूध संकलन, वितरण कमी झाल्यामुळे कामगारांचे पगार भागविण्याइतकीही आर्थिक ताकद महानंदमध्ये राहिली नाही. त्यामुळे भाजपचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून महानंदला सरकारकडून आर्थिक मदत मिळावी आणि महानंद आर्थिक अडचणीतून बाहेर यावे, यासाठी बहुमत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महानंदच्या पदाधिकारी निवडीची सर्व सूत्रे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिली होती. त्यामुळेच, विखेंना आपले सख्खे मेहुणे राजेश परजणे यांची अध्यक्षपदी सहजपणे वर्णी लावता आली. शिवाय परजणे यांना महानंदमध्ये काम करण्याचा अनुभवही आहे.

भाजपविरोधातील बंडखोरीकडे डोळेझाक

विधानसभेच्या २०१९ वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपने स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली होती. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्याशी चुरशीची लढत होती. कोल्हे यांचे पारडे जड मानले जात असतानाच राजेश परजणे यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली. त्याचा परिणाम म्हणून भाजप उमेदवार कोल्हे यांचा केवळ ८२२ मतांनी निसटता पराभव झाला. त्या निवडणुकीत परजणे यांना १५,४४६ मते मिळाली होती. कोल्हे यांना ८६,७४४, तर विजय आशुतोष काळेंना ८७,५६६ मते मिळाली होती. परजणे यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. पण, महानंदच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावताना त्यांच्या बंडखोरीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले.

भाजपमध्ये विखेंची घराणेशाही

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या रुपाने भाजपमध्ये घराणेशाहीचा नवा अंकच पाहायला मिळत आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे नगरचे खासदार आहेत. या दोन महत्त्वाच्या राजकीय पदांनंतर आता महानंदच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून राजेश परजणे यांच्या रुपाने तिसरे मोठे राजकीय पद विखेंच्या घरातच गेले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp majority in mahanand yet command is in the hands of radhakrishna vikhe print politics news ssb