बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप अजून सुरूच आहेत. एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राज्याचे कृषिमंत्री आणि पक्षाचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि विधानसभा सदस्यत्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे दोन मंत्री अशा वादात अडकल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार अडचणीत सापडले आहे. कोकाटे यांना दोषी ठरवण्याआधी महायुती सरकार मस्सेजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दोन महिन्यांपासून मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना या प्रकरणात अटक करण्यात आल्यावर आगपाखड करत होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे फडणवीस सरकार अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.
फडणवीस सरकार अडचणीत सापडण्याचे कारण काय?
नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पारदर्शक आणि जबाबदार सरकारचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांमुळे अडचणीत सापडले आहेत. विरोधी महाविकास आघाडीने (मविआ) त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंडे आणि कोकाटे यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. “आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो,” असे ते म्हणाले. भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव न सांगण्याची विनंती करत सांगितले की, कोकाटे यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यावर भाष्य करणे अयोग्य ठरेल. मात्र, अशा घडामोडी सरकारच्या प्रतिमेला शोभणाऱ्या नाहीत. आमची त्रिपक्षीय युती असल्याने प्रत्येक निर्णय आघाडीतील भागीदारांशी चर्चा करून त्यांच्या सहमतीने घ्यावा लागतो,” असे ते म्हणाले.
विधानसभेचे माजी प्रधान सचिव अनंत काळे म्हणाले की, निवडून आलेल्या सदस्याला दोषी ठरवणे ही गंभीर बाब आहे. “जर दोषी व्यक्तीने उच्च न्यायालयात अपील केले आणि दोषी ठरविण्यास स्थगिती मिळाली तर सदस्यत्व रद्द करणे टाळता येईल असे ते म्हणाले. कोकाटे यांनी सांगितले, “न्यायालयाने मला दोषी ठरवले आहे, या निर्णयाला मी उच्च न्यायालयात आव्हान देईन,” असे त्यांनी माध्यमांना सांगितले. कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा झालेला कोणताही लोकप्रतिनिधी पदावर राहू शकत नाही.
फसवणूक प्रकरण काय आहे?
हे प्रकरण १९९७ मध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी १० टक्क्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विवेकाधिकार कोट्यातील घरे मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर होता. कोकाटे बंधूंविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट कागदपत्रे तयार करणे), ४७१ आणि ४७४ (सत्य लपवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे कोण आहेत?
माणिकराव कोकाटे हे पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यांना त्यांच्या वारंवार पक्षांतरामुळे ‘पार्टी हॉपर’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस काँग्रेसमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि १९९९ मध्ये शरद पवार यांनी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला होता, तेव्हा ते त्यांच्याबरोबर बाहेर पडले. त्याच वर्षी राष्ट्रवादीने विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर ते शिवसेनेत (तेव्हा अविभाजित) सामील झाले आणि सिन्नरची जागा जिंकली. २००४ मध्ये त्याच जागेवरून ते पुन्हा निवडून आले.
२००६ मध्ये ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत काँग्रेसमध्ये परतले आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून सिन्नर मतदारसंघातून लढले आणि विजयी ठरले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, परंतु सिन्नरमधून शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कोकाटे राष्ट्रवादीत परतले आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक सिन्नरमधून लढली आणि जिंकली. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा नाशिकमधून अपक्ष म्हणून पराभव झाला.
जुलै २०२३ मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून एनडीएमध्ये प्रवेश केल्याने कोकाटे यांनी त्यांची बाजू घेतली. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उदय सांगळे यांचा ४०,००० मतांनी पराभव केला होता. कोकाटे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ४८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. शेतकऱ्यांसाठीच्या सरकारच्या पीक विमा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, “भिकारीसुद्धा एक रुपया भीक घेत नाहीत आणि इथे आम्ही पीक विमा देत आहोत, असे असूनही लोक त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत आहेत.”