सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या काळात धनंजय मुंडेपेक्षाही राजकारणात ‘वरिष्ठ’ असताना मंत्रीपदासाठी नाकारलेले माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साेळंके सध्या भारत राष्ट्र समितीचे के. एस. राव यांच्या प्रेमात आहेत. त्यांनी नुकतेच तेलंगणातील विकासकामांचे वृत्तचित्रण असणारे ‘पेन ड्राईव्ह’ अनेक आमदारांना आवर्जून भेट दिले आहेत. त्यांचे काम जाऊन पाहिले, त्यांनी आठ-दहा वर्षांत प्रदेशात क्रांती होईल अशा योजना राबविल्या आहेत. त्यामुळे त्यांची स्तुती केली, असे खुलासा करत मी नाराज नाही पण पर्यायांचा शोध सुरू असल्याचे ‘लोकसत्ता’ शी बोलताना त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून नाराज असणारे सोळंके भाजप नेत्यांशीही जुळवून घेत होते. ‘केसीआर’ यांच्या कामाचे कौतुक राज्यातील आमदारांपर्यंत करण्याची त्यांची ही कृती भुवया उंचवायला लावणारी आहे.
हेही वाचा… अयोध्यावारी आणि नाशिकचे शिवसैनिक समीकरण जुळले
प्रकाश सोळंके यांनी भाजपचे रमेश आडसकर यांचा ११ हजार ६०० मतांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. तत्पूर्वी २०१४ मध्ये मात्र त्यांना भाजप लाटेत ३६ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले होते. तत्पूर्वी सलग तीन वेळा ते विधिमंडळाचे सदस्य होते. त्यांचे वडील सुंदरराव सोळंके हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक. ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही होते. त्यांच्या नावे एक सहकारी साखर कारखाना माजलगावमध्ये गेली ३६ वर्षे सुरू आहे. सहकार क्षेत्रात दबदबा असणारे प्रकाश सोळंके मात्र राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे ते वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून देत आहेत. या अनुषंगाने त्यांना विचारले असता ,‘मी नाराज नाही. एखाद्या व्यक्तीचे काम आवडले तर त्याची स्तुती करावी. केसीआर यांची मी भेट घेतली. त्यांचे राज्यातील काम पाहून प्रभाावित झालो. त्यांच्या कामाचा प्रसार महाराष्ट्रातही व्हावा म्हणून तेथील छायाचित्रणही अनेक आमदारांना पाठविले’, असे सोळंके म्हणाले.
हेही वाचा… भाजपचे सत्ता हे साधन की साध्य?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्रीपद दिले नसल्याची नाराजी त्यांच्या बोलण्यातून दिसत असल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहेच. त्यांची वर्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी करावी, अशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, असे पद निर्माण करण्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तयार नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. या पदावर वर्णी लावण्यास पक्ष तयार होता. मात्र, त्यास मी फार सकारात्मक नव्हतो, असेही सोळंके यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नाराज नाही, पण पर्यायाचा शोध सुरू असल्याचे प्रकाश सोळंके यांचे म्हणणे आहे.