मोहनीराज लहाडे
नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. पक्षाचे उपनेते, माजी राज्यमंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेना जिल्ह्यात नेतृत्वहीन झाली. त्यानंतर पक्षात प्रवेश करून मंत्री झालेले शंकरराव गडाख (अपक्ष) यांच्याकडे पक्षाने जिल्ह्याची धुरा सोपवली. त्यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी जुलै २०२१ मध्ये शिवसंपर्क अभियान टप्पा-१ राबवण्यात आले. त्यासाठी गडाख जिल्ह्यात फिरले. मात्र कोणत्याही शिवसैनिकांनी त्यांच्याकडे महाविकास आघाडीमध्ये होत असलेल्या कुचंबणेची, अवहेलनेची तक्रार केली नाही. मात्र आता वर्षानंतर पुन्हा ‘शिवसंपर्क अभियान टप्पा क्रमांक-२’ जिल्ह्याच्या दक्षिणेतील भागात राबवण्यासाठी पक्षाचे निरीक्षक, खासदार गजानन कीर्तीकर हे जुनेजाणते शिवसेना नेते आले आणि शिवसैनिकांच्या होत असलेल्या कोंडमाऱ्याला वाचा फुटली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून होत असलेल्या दबावाच्या राजकारणाविरोधात भडभडून तक्रारी केल्या. विशेषतः कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यात आला.
शिवसैनिकांची व्यथा ऐकून खासदार कीर्तीकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जाहीरपणे इशारा द्यावा लागला. त्याचे परिणाम आगामी जिल्ह्यातील आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमटणार हे जवळपास निश्चित आहे. महाविकास आघाडीतील सत्तेच्या अडीच वर्षानंतर, तिन्ही पक्षांचे परस्परांशी असलेले सुरुवातीचे गोडीगुलाबीचे संबंध आता संपुष्टात येत चालले आहेत. शिवाय जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध स्थानिक पदाधिकाऱ्यांना लागले आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे स्वाभाविकच जिल्ह्यावर त्यांचेच वर्चस्व जाणवते.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत, मात्र त्यांचे कार्यक्षेत्र जिल्ह्याच्या उत्तर भागात आहे, शिवाय ते राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा भाजपमधील प्रस्थापितांशी पंगा घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांनी गाऱ्हाणे कोणापुढे मांडायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. शिवसैनिकांना संपर्क अभियानात गाऱ्हाणे मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
कर्जत नगरपालिकेच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतून शिवसेनेला राष्ट्रवादीने एक झटका दिला. पालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा विषय आमदार पवार यांनी शेवटपर्यंत झुलवत ठेवला, शिवसेनेला एकही जागा दिली गेली नाही. पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच आहे. पालकमंत्र्यांकडून शिवसेना पदाधिकार्यांच्या कामांना निधी उपलब्ध होत नाही, कर्जत-जामखेड मतदार संघात नोकरीला असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पद सोडण्यासाठी दबाव आणला जातो, कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मिळेनासे झाले, सरकारी अधिकारीही जुमानत नाही, राष्ट्रवादीकडून होत असलेल्या या कोंडीला कीर्तिकर याच्या दौर्यात वाचा फुटली.
त्यातूनच खा. कीर्तिकर यांनी आ. रोहित पवार यांना जाहीरपणे इशारा दिला. ‘आघाडीचा धर्म पाळा, अन्यथा शिवसैनिकही आघाडीला बांधील राहणार नाहीत’, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांनी तयारीला लागण्याच्या सूचनाही केल्या. कीर्तिकर यांनी रोहित पवार यांना दूरध्वनी लावला, मात्र संपर्क झाला नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांमार्फत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणू असेही कीर्तीकर म्हणाले. शिवसेनेने तयार केलेला, घडवलेला कार्यकर्ता डोळ्यादेखत पळवला जात असल्याचे दुःख त्यांना झाले होते.
हिंदूजननायकाच्या प्रतिमेतून मनसेचे नवनिर्माण होणार?
शिवसैनिकांना आघाडीत होणाऱ्या कुचंबणेचे दुःख आपल्या पक्षश्रेष्ठींकडे मांडता तरी आले, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांना आघाडीत डावलले जाण्याची भावना कोणापुढे बोलून दाखवायची असा प्रश्न पडलेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष कर्जतमधीलच आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके राष्ट्रवादीच्या सहकार्याने जिल्हा बँकेवर स्वीकृत संचालक झाले, त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आघाडीतील कुचंबणेला वाचा फोडण्यास साळुंके यांच्यावर मर्यादा आलेल्या आहेत.
आमदार पवार यांच्या कार्यशेलीमुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची गतही कर्जत-जामखेड वगळून उर्वरीत भागासाठी जिल्हाध्यक्ष अशीच झाली आहे. सरकारी कार्यालये, जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संपर्कासाठी जी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी असते तीच कर्जत-जामखेडमध्ये डावलली जात आहे. तिची जागा भरून काढली आहे ती रोहित पवार यांच्या खासगी यंत्रणेने. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचाही कर्जत-जामखेड हाच मतदार संघ होता. सलग पाच वर्षे पालकमंत्रिपद मिळूनही त्यांना आपले नेतृत्व प्रस्थापित करता आले नाही. गेल्या वर्षभरात भाजपचे अनेक पदाधिकारी आमदार पवार यांनी राष्ट्रवादीकडे वळवले. परंतु हतबल होऊन पाहण्या व्यतिरिक्त शिंदे यांच्यापुढे पर्याय राहिलेला नाही. संघर्षाच्या मनस्थितीतही शिंदे नाहीत.