छत्रपती संभाजीनगर : आचारसंहिता जाहीर होताच ‘महायुती’ सरकारने ‘आरक्षण’ प्रश्न सोडविला नाही, अशी खंत व्यक्त करत पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (अजित पवार) सतीश चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्यांची ही टीका पक्षांतराचे पुढे पडणारे पाऊल असल्याचे मानले जात आहे. गेल्या दीड वर्षापासून ते गंगापूर विधानसभा मतदारसंघात बांधणी करत आहेत. अजित पवार यांच्याबरोबर राहणाऱ्या सतीश चव्हाण यांना महायुतीमध्ये गंगापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व सध्या भाजपचे आमदार प्रशांत बंब करत आहेत. त्यामुळे महायुतीवर आरक्षण प्रश्न न सोडवल्याची टीका त्यांनी केली. अलिकडेच त्यांनी आंतरवली सराटीमध्ये जाऊन आरक्षण आंदोलनकर्ते मनाेज जरांगे यांचीही भेट घेतली हाेती.
गंगापूर हा भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी बांधलेला मतदारसंघ आहे. विविध प्रकारच्या लाभार्थी योजना, तीर्थयात्रांना भेटी देण्यासाठी विविध सिंचन योजनांमध्येही त्यांनी जोर लावला होता. त्यांनी बांधणीसाठी खास कार्यकर्तेही नेमले आहेत. गेल्या काही निवडणुकीमध्ये गंगापूर हा मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचे प्रमूख केंद्र मानले जाते. या मतदारसंघात ‘मराठा’ आरक्षण आंदोलनाला मिळालेला पाठिंबा लक्षात घेता हाच मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी असेल असे मानले जाते. त्यामुळे या मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनीही बांधणी सुरू केली. गावागावातील सरपंचापासून ते तरुण मुलांपर्यंत अनेकांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी त्यांनी या मतदारसंघात संपर्क वाढवला. महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे.
हेही वाचा – हितेंद्र ठाकूरांचा कल महाविकास आघाडीकडे ?
हेही वाचा – बीआरएसपी विधानसभेच्या मैदानात, दीडशे जागांवर चाचपणी
गंगापूर मतदारसंघात खुलताबाद नगरपालिकेचा समावेश आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. लोकसभेतील मराठा, मुस्लिम व दलित असे समीकरण पुन्हा तयार व्हावे असे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे प्रशांत बंब यांची या मतदारसंघावर पकड आहे. २००९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवून ५३ हजार ०६७ मते घेऊन ते विजयी झाले होते. २०१४ मध्ये ५५ हजार ४८३ मते मिळाली होती. २०१९ मध्येही त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. त्यामुळे गंगापूर विधानसभा मतदारसंघात यावेळी तुल्यबळ लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.