छत्रपती संभाजीनगर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असून तो ‘ सर्वांनी मिळून सोडवावा’अशी विनंती करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, बोलताना या निर्णयामध्ये अजित पवार यांचेही त्यांनी नाव घेतल्याने ही जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातून पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव आता चर्चेत आले आहे. त्यांना उस्मानाबादची उमेदवारी द्यावी असे सूचविण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी मुंबईमध्ये बोलावून घेतले. पक्षाने आदेश दिला तर तो पाळू, असे सतीश चव्हाण यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी उस्मानाबाद लोकसभेच्या जागेसाठी आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारास महायुतीने मदत करावी, असे सूत्र ठरविण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी बसवराज पाटील भाजपमध्ये आल्यानंतर उस्मानाबादमधील ‘ लिंगायत मतपेढी’ चा अभ्यास नव्याने करण्यात आला होता. मराठा – विरुद्ध लिंगायत अशी मतपेढीची रचना झाल्यास अडचणी वाढतील, असाही युक्तीवाद बैठकांमध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या मतदारसंघातून भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचे चित्र दिसून येत होते. यामध्ये राणा जगजीतसिंह पाटील, बसवराज पाटील, बसवराज मंगरुळे, मिलिंद पाटील, नितीन काळे आदी नावे चर्चेत होती. मात्र, जागा राष्ट्रवादीला सुटल्यास सुरेश बिराजदार, राहुल मोटे यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र, जेवढ्या जागा लढवू त्यात अधिक विजयी होतील आणि ‘ स्ट्राईक रेट’ चांगला राहील असे प्रयत्न करू, असे अजित पवार गटाने ठरविले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच सतीश चव्हाण यांचे नाव आता राजकीय गोटात चर्चेत आहे.

हेही वाचा : मुंबईतील तीन मतदारसंघांतील तिढ्याने उमेदवारांचा शोध सुरू

ही जागा शिंदे सेनेच्या नेत्यांना सोडल्यास आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय हेही इच्छूक असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता ही जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता अधिक असून पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नावावर विचार सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान हा प्रश्न आता स्थानिक नेत्यांनी सोडवावा त्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या जागेबाबतचा तिढा एक दोन दिवसात सोडवला जाईल असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla satish chavan may get lok sabha candidacy from usmanabad lok sabha seat print politics news css