अलिबाग : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद विकोपाला गेले आहे. पालकमंत्री पदाचा मुद्दा हा यात कळीचा ठरला आहे. शिवसेना आमदारांच्या विरोधामुळे आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पक्षाच्या मोर्चेबांधणीला सुरूवात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या महाड, अलिबाग आणि कर्जत मतदारसंघांवर पक्षाने लक्ष्य केंद्रीत केले आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकाळापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही. लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या आमदारांनी जुने वाद विसरून सुनील तटकरे यांच्याशी जूळवून घेतले. मात्र विधानसभा निवडणूकीत कर्जत मतदारसंघावरून दोन्ही पक्षात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवल्याने, दोन्ही पक्षातील वाद पुन्हा विकोपाला गेले. निवडणूकीनंतर शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे पुन्हा निवडून आले. पण निकालानंतर तिघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना उमेदवारांना पाडण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप केला.

मंत्रीमडळ स्थापनेनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांची तर शिवसेनेकडून भरत गोगावले यांची मंत्रीपदावर वर्णी लागली. पण रायगडच्या पालकमंत्रीपदावरून दोन्ही महायुतीचे घटक पक्ष एकमेकांविरोधात रस्त्यावर ठाकले. त्यामुळे आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला अवघ्या २४ तासात स्थगिती देण्याची वेळ आली. जवळपास दोन महिन्याच्या कालावधीनंतरही पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटला नाही. दोन्ही पक्षातील मतभेद आणि मनभेद मिटले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आता शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

गोगावले यांच्या महाड मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या स्नेहल जगताप यांनी निवडणूकीनंतर चारच महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. महत्वाची बाब म्हणजे त्या भाजपच्या मार्गावर होत्या. पक्षासोबत त्यांची बोलणी झाली होती. प्रविण दरेकर स्नेहल जगताप यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र अचानक सुनील तटकरे राजकीय खेळी करून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला. दुसरीकडे महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात शेकापचे नारायण डामसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश झाला आहे. तर महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात नगरोत्थान योजनेतून तटकरे यांनी ७० कोटींची शिवसृष्टी मंजूर करून घेतली आहे. तर पद्मदूर्ग किल्ल्यावर जेट्टी उभारण्याची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्राबल्य असलेल्या मुरुड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेगटात अस्वस्थता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्नेहल जगताप यांना मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे हे सिध्द झाले आहे. त्यांना घेऊन फार फरक पडेल असे वाटत नाही. कारण चार पक्ष विरोधात असूनही मला महाडच्या मतदारांनी निवडून दिले. हे विसरून चालणार नाही. स्नेहल जगताप निवडणूकीपूर्वी आम्हाला नितीमत्तेच्या गोष्टी सागंत होत्या, आता त्यांची नितीमत्ता कुठे गेली. -भरत गोगावले, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री