जालना विधानसभा मतदार संघात महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अरविंद चव्हाण इच्छुक आहेत. महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) अर्जुन खोतकर यापूर्वी या मतदार संघाचे प्रतिनिधी राहिलेले असून, यावेळेसही त्यांची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनीही या मतदार संघातून संपर्क वाढविलेला असून इच्छुक उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रवक्ते आमदार राजेश विटेकर यांनी बुधवारी वार्ताहर बैठकीत बोलताना जालना विधानसभा मतदार संघातून आपला पक्ष निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यासाठी अरविंद चव्हाण यांचे नाव ठरविलेले असल्याचे सांगितले.
हेही वाचा…कारण राजकारण: बागडे राजभवनात, काळे लोकसभेत; फुलंब्रीत कोण?
विटेकर म्हणाले, अरविंद चव्हाण यांना महायुतीमधून जालना विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी, यासाठी एक शिष्टमंडळ अजित पवार यांना मुंबईत भेटले. जालना जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समावेश असलेल्या शिष्टमंडळाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांनाही चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात आग्रह केला. आम्ही मागणी केलेली आहे. परंतु यासंदर्भातील अंतिम निर्णय महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असेही विटेकर म्हणाले.
चव्हाण यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर जालना विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रनिहाय समित्यांची स्थापना केलेली आहे. त्याप्रमाणे जिल्हा तसेच तालुका पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी केलेली आहे, असे विटेकर म्हणाले.
हेही वाचा…शिल्पकार आणि सल्लागार ‘गायब’
२००९ मध्ये मतदार संघाची पुनर्रचना होण्यापूर्वी अरविंद चव्हाण यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यानंतर २०१४ मध्ये जालना विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढविली होती. यावेळी त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी अटीतटीची लढत दिली होती. चव्हाण जालना सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे संचालकही आहेत. जालना जिल्हा परिषदेचे ते माजी कृषी सभापती तर जालना बाजार समितीचे माजी उपसभापती आहेत.