कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यात राजकीय परिस्थितीची आढावा घेतला. डॉ. चेतन नरके यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चाचपणी केली.
अलीकडेच अजित पवार कोल्हापुरात दौऱ्यावर आले होते. गोकुळचे संचालक, भावी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे सुपुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अभिजीत यांच्या हॉटेलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांचा भर तरुण पिढीने उद्योजकतेकडे वळण्यासह शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून स्थिरता प्राप्त करण्यावर राहिला. सर्वपक्षीय उपस्थिती असतानाही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांच्या बिद्री कारखान्याच्या आसवानी प्रकल्पाला अडथळा आणण्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावरून शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांना उद्देशून ज्या गावच्या त्या गावच्या बोरीदेखील असतात असा उल्लेख करून विधानसभा निवडणुकीला बघून घेण्याचा सूचक इशारा देणारे टोकदार राजकीय भाष्य केले.
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची महाआघाडी होणार का? ‘नितीश कुमार फॅक्टर’चे महत्त्व काय?
लोकसभेसाठी चाचपणी
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार कोण याची चर्चा घडत आहे. सक्षम उमेदवार कोण याबाबतीत अद्याप मतैक्य झालेले नाही. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्यासह चौघेजण इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यातले अन्य दोघे कोण याचा उलगडा पक्षातील कार्यकर्त्यांनाही अद्याप झालेला नाही. पैकी नरके यांनी ‘मविआ’तील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांची गाठीभेटी घेऊन उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीला हात घातला आहे. या दौऱ्यात अजित पवार यांनी अरुण नरके यांच्या निवासस्थानी भेट देवून कुटुंबीयांशी राजकीय संवाद साधला. चेतन यांचे नाव शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण आदी प्रमुख नेत्यांकडून ऐकायला मिळते, असा उल्लेख करीत पवार यांनी त्यांना उमेदवारी बाबत आश्वासित केले. याचवेळी अन्य उमेदवार कोण असू शकतात याचा अंदाज घेतला असला तरी गाडे काही पुढे सरकण्याच्या स्थितीत नाही.
सतेज पाटील यांना इशारा
राज्यातील ‘मविआ’च्या राजकारणात थोरला – धाकटा भाऊ यावरून वादाची वळणे वाहत आहेत. त्याचा एक प्रवाह कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातही स्त्रवत राहिला. ‘काँग्रेसचे ४४, आम्ही ५४ आहोत. उद्धव ठाकरेंची शिवसेना ५६ होती. हे गणित आहे,’ असे विधान करून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ असल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काँग्रेस मोठा भाऊ असल्याच्या विधानाला शह देऊन नव्या वादाला तोंड फोडले. याच कार्यक्रमात त्यांनी कोल्हापुरातील स्थानिक स्वराज्य संस्था गटातील काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्याकडील जागा राष्ट्रवादी घेऊ शकते, असे सुचित केले. अर्थात राष्ट्रवादीसाठी हा प्रवास किती सोपा असणार यावरही वाद झडत राहिला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वप्रथम जिल्ह्यातील दोन्ही महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद येथील सदस्य संख्याबळ वाढवावे लागेल. शिवाय विधान परिषद निवडणुकीचे राजकारण, अर्थकारण पाहता ते निभावणारा सक्षम उमेदवार शोधण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.