मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी अजित पवार गटाची असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शरद पवार गटाने आयोगाकडे पर्यायी चार चिन्हांबरोबर पक्षाच्या नावांची मागणी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर काय निर्णय होतो, त्यानुसार आयोगाकडे सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत भूमिका घेतली जाणार आहे.
शरद पवार गटाकडून नवीन पक्षासाठी ‘कपबशी’, ‘सूर्यफूल’, ‘उगवता सूर्य’,’चष्मा’ या चिन्हांचा पर्याय देण्यात येणार आहे. तर पक्षाच्या नावासाठी ‘शरद पवार काँग्रेस’, ‘मी राष्ट्रवादी’, ‘शरद स्वाभिमानी पक्ष’ अशी नावे सुचविली जाण्याची शक्यता आहे. संख्याबळानुसार राज्यसभेची निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटाकडून उमेदवार दिला जाणार नाही. त्यामुळे पक्ष नाव व चिन्हाबाबत सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून काही अंतरिम आदेश किंवा आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यास त्यानुसार शरद पवार गटाकडून पुढील निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा : ‘राम मंदिरा’मुळे समाजवादी अडचणीत, आमदारांमध्ये दुफळी; पक्षाची नेमकी भूमिका काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार यांना आयोगाचा निर्णय अशा पद्धतीने येईल, याची कल्पना होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुळ पक्षाचे शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह ‘ धनुष्यबाण’ चिन्ह आयोगाने बहाल केले होते.याच धर्तीवर आपल्यालाही मूळ पक्ष म्हणून मान्यता आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळेल, असा विश्वास अजित पवार गटालाही होता.
मुख्यालयाचा ताबा कोणाकडे?
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे असलेल्या बँलार्ड पिअर येथील पक्षाच्या मुख्यालयाचा ताबा अजित पवार गट घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण’ हे निवडणूक हे चिन्ह मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनाभवन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नव्हता.तसे अजित पवार गट करणार का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.