सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पक्षांतराबाबत मौन स्वीकारले असतानाच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे १७ फेब्रुवारी रोजी इस्लामपूर दौर्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते राजारामबापू इन्स्टिट्यूटमध्ये बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यामुळे राजकीय निरीक्षकांची भुवया पुन्हा उंचाावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने चांगले यश मिळवले. मात्र, यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बोटावर मोजण्याइतपतच जागा पक्षाला मिळाल्या. पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर आ. पाटील यांनी फारशी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. तथापि, महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आ. पाटील पक्षांतर करणार असल्याच्या वारंवार चर्चा घडत असल्या तरी ठोस काहीही निष्पन्न झालेले नाही. तरीही भाजप नेत्यांकडून वारंवार एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिध्द होत आले असून हा मोठा नेता म्हणजेच आ. पाटील हेच असल्याचे सांगण्यात येते. तथापि, आ. पाटील यांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
पक्षाच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत आ. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारीही दर्शवली. यासाठी आठ दिवसांची मुदतही सांगितली होती. मात्र, बैठक होउन महिना झाला तरी याबाबत काहीच हालचाल दिसत नाही. दुसर्या बाजूला त्यांचे भाजप नेत्यांशी संपर्क असल्याचा दावा राजकीय क्षेत्रात केला जात आहे.सात वेळा निवडणुका जिंकलेल्या इस्लामपूर मतदार संघात आ. पाटील यांचे मताधिक्य ७० हजारावरून १२ हजारावर आल्याने बालेकिल्ला अडचणीत आला असल्याची जाणीवही त्यांना झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांनी अद्याप मौन बाळगले असल्याने त्यांचे निकटचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
मतदार संघातच नव्हे तर जिल्ह्यात त्यांच्या भूमिकेचे गूढ निर्माण झाले असून त्यांना पक्षांतर करायचेच असेल तर ते राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षापेक्षा भाजपला प्राधान्य देतील असे सांगितले जात आहे.
दरम्यान, या संभ्रमावस्थेतच आ. पाटील यांचा १६ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सध्या कार्यकर्ते गुंतले आहेत. वाढदिवस झाल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजेच दि. १७ फेब्रुवारी रोजी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आरआयटी मध्ये इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आ. पाटील यांची गडकरी यांच्याशी जवळीक अधिक दिसत असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला अधिक बळकटी मिळत असल्याचे मानले जात आहे. तरीही त्यांचे मौन ज्यावेळी सुटले त्यावेळीच त्यांचा निर्णय जाहीर होणार असल्याने कार्यकर्त्यांची दबक्या आवाजातच चर्चा सुरू आहे.
© The Indian Express (P) Ltd