नाशिक : दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पानिपत केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे बंडखोरी करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात मोर्चेबांधणीला लागले आहेत. निफाड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याचा श्रीगणेशा केला. लोकसभा निवडणुकीत निफाड मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्यानंतर अस्वस्थ झालेले अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाली आहे. एकेकाळी ३५ आमदार सोडून गेल्यानंतर मुख्यमंत्रिपद गमावून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी शरद पवार यांच्या खांद्यावर आली होती. मालोजीराव मोगल यांच्या सोबतीने नाशिक जिल्ह्यात नेटाने काम करीत सर्व जागांवर विजय कसा मिळवला होता, याची आठवण करून देत त्यांनी अजित पवार गटाला सूचक इशारा दिला आहे.
लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार हे प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले होते. माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्या स्मृतिनिमित्त निफाड तालुक्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार यांनी आठवणींना उजाळा देताना भूतकाळातील राजकीय स्थित्यंतराचे दाखले दिले. निफाड हा दिंडोरी लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ. जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. सेना, राष्ट्रवादीतील बंडानंतर घाऊक पक्षांतर झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा कुणी लोकप्रतिनिधी दिंडोरीत राहिलेला नव्हता. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने भास्कर भगरे या सामान्य शिक्षकाला मैदानात उतरवत भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पराभूत करण्याची किमया केली. कृषिबहुल मतदारसंघात शरद पवार यांची पहिली खेळी यशस्वी झाली. आगामी विधानसभेच्या दृष्टीने आता त्यांनी डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा : नागपूरहून अग्नी क्षेपणास्त्राचा मारा’; सरसंघचालकांच्या टिप्पणीनंतर काँग्रेसचा पंतप्रधानांना टोला
निफाड विधानसभा मतदारसंघाचे सध्या अजित पवार गटाचे दिलीप बनकर हे प्रतिनिधीत्व करतात. गतवेळी त्यांनी एकसंघ शिवसेनेचे अनिल कदम यांना १८ हजार मतांनी पराभूत केले होते. अजित पवार यांच्या बंडात जिल्ह्यातील दिलीप बनकर यांच्यासह अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माणिक कोकाटे, नितीन पवार, सरोज अहिरे या आमदारांनी साथ दिली. संबंधितांच्या मतदार संघाकडे पवार यांचे आधीपासून लक्ष आहे. प्रकृती फारशी ठीक नसतानाही निफाडमधील कार्यक्रमास त्यांनी जाणीवपूर्वक हजेरी लावली. पडत्या काळात साथ देणाऱ्या माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्या सारख्या सहकाऱ्यांच्या साथीने राज्याच्या राजकारणास कलाटणी दिल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. सर्व आमदार सोडून गेल्यानंतर मालोजीराव सोबत राहिले. आम्ही दोघांनी जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन संवाद साधला. नाशिकची सूत्रे मालोजीराव यांनी खांद्यावर घेतली होती. संबंध जिल्हा पायाखाली तुडवला होता. नाशिकमधील सर्व जागा आम्ही निवडून आणल्याची आठवण कथन केली. यामागे स्वकीय बंडखोरांसमोर आव्हान निर्माण करण्याचे नियोजन आहे. निफाडच्या राजकारणात दोन दशकांपूर्वी बोरस्ते आणि मोगल गटाचा प्रभाव होता. आमदार दिलीप बनकर यांनी मोगल गटाचे अस्तित्व संपुष्टात आणले. हा गट पुन्हा उभा करण्यासाठी राजेंद्र मोगल प्रयत्न्त आहेत. पवार यांनी मालोजीरावांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विधानसभेत मोगल गटाचा लाभ होईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात निफाडची जागा राष्ट्रवादी शरद पवार गट घेईल की, शिवसेना ठाकरे गटाकडे जाईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांच्या प्रचारात ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा अधिक सक्रिय होते. या काळात शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीक अधिक वाढली. निफाडची जागा शिवसेना ठाकरे गटाला न सुटल्यास कदम हेच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार असतील. अशीही एक शक्यता वर्तविली जाते. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडील अन्य मतदारसंघात पवारांकडून नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.