मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीचे आरोप, त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अमलबजावणी संचालनालय(ईडी) यांनी खोट्या गुन्ह्यांत आपल्याला १४ महिने तुरुंगात डांबून ठेवल्याची घटना, कुटुंबाचा केलेला छळ या संपूर्ण कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली असतानाच कथित १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अटक झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मकथनाच्या माध्यमातून आपली बाजू जनतेसमोर आणली आहे. आपल्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. उद्याोगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवणे. मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्याशी संबंधित बाबींवरही त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे.

हेही वाचा : सिंचन घोटाळाप्रकरणी आर. आर. पाटलांनी फसवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

देशमुख यांनी या पुस्तकातून काही धक्कादायक खुलासे समोर आणताना फडणवीस यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि वरिष्ठांच्या मदतीने ईडी व सीबीआय तपासाचा ससेमिरा मागे लावून कारागृहात टाकल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी आपल्याकडे समित कदम या दूतामार्फत एक प्रस्ताव पाठवला होता. त्यात तत्कालीन मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ३०० कोटी रुपये जमा करून द्या, असे सांगितल्याचा आरोप करणारे प्रतिज्ञापत्र द्या. याच प्रतिज्ञापत्रात दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना गोवणारी माहिती द्या तसेच अजित पवार अनिल परब यांच्या विरोधातही प्रतिज्ञापत्र देण्यास सांगण्यात आले होते. मात्र आपण त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला. एवढेच नव्हे तर ही सगळी माहिती पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही दिली. फडणवीसांचा खोट्या प्रतिज्ञापत्राचा प्रस्ताव धुडकावला आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी आपल्या व आपल्याशी सबंधित लोकांच्या घरांवर ईडीचे छापे पडल्याचे देशमुख यांनी या पुस्तकात म्हटले आहे. या कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार फडणवीस आहेत असे विधान आपण केल्यानंतर मी गप्प बसलो नाही तर माझ्यावरील आरोपांबाबतचे पुरावे सार्वजनिक करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला होता. पण आपली बाजू खरी असल्याने त्यांनी तथाकथित पुरावे लवकर सार्वजनिक करावे, असे आव्हानही फडणवीस यांना दिल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : घर फोडण्याचे पाप कधी केले नाही! अजित पवारांच्या आरोपाला शरद पवारांचे उत्तर

परमबीर सिंह यांचे वर्तन अतिशय संशयास्पद होते. त्यांच्याच विरोधात राज्य पोलीस, भ्रष्टाचारविरोधी पथक आणि सरकारकडून चौकशी सुरू होती. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा एकदम खास माणूस असलेल्या सचिन वाझेला अटक झाली होती आणि दुसरा खास माणूस असलेल्या प्रदीप शर्माला अटक होणार होती. अशा व्यक्तींच्या (परमबीर सिंह) जबाबांचा आधार घेतला गेला. गंमत म्हणजे त्या परमबीर सिंह यांनीच नंतर आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आपण केवळ ऐकीव माहितीच्या आधारे हे आरोप केले होते असे नंतर कबूल केले होते. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत आपल्याला क्लीन चिट देण्यात आली तसेच आपल्याविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले. मात्र हा अहवाल माध्यमांमधून बाहेर येतात तो दडपण्यात आला आणि खोटा अहवाल तयार करून आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असे या पुस्तकात म्हटले आहे.