जळगाव : राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना प्रवेश देण्यास जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरूवातीला तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, त्याच पदाधिकाऱ्यांनी आता स्वागताची भूमिका घेतल्याने देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत. अशा स्थितीत जळगाव ग्रामीणमधील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढली असून, शिंदे गटाचे नेते तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकर यांना डिवचले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिंदे गटाचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात थेट लढत रंगली होती. मंत्री पाटील यांनी माजी मंत्री देवकर यांचा पराभव केला. दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर देवकर यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिल्यावर अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला होता. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार गटात देवकर यांच्या पक्ष प्रवेशावरून उडालेल्या भडक्यात तेल ओतण्याचे काम केल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. अर्थातच, पक्षश्रेष्ठी अनुकूल असतानाही देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश त्यामुळे रखडला.

पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर यथावकाश अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी देवकर यांच्या प्रवेशासंदर्भात आता नव्याने प्रतिक्रिया दिली आहे. देवकर यांनाच नाही तर इतर राजकीय पक्षांच्या आजी-माजी आमदार, माजी खासदार व माजी मंत्र्यांना, शरद पवार गटाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही अजित पवार गटात येण्याचे आवाहन केले आहे. जो कोणी चांगला पदाधिकारी पक्ष संघटन वाढवेल, त्यांचे पक्षात स्वागत करण्याची आमची भूमिका आहे. विरोध होतच असतो. कोणी म्हणते घेऊ नये, कोणी म्हणते घ्या, आमचे पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल, असे जिल्हाध्यक्ष पवार यांनी म्हटले आहे. यावरुन देवकर लवकरच अजित पवार गटात दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

देवकर तुरुंगात जातील – गुलाबराव पाटील

दुसरीकडे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार गटातील प्रवेशाच्या संकेतानंतर गुलाबराव देवकर यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. देवकर यांनी निवडणुकीच्या काळात जळगाव जिल्हा बँकेतून सुमारे १० कोटी रुपयांचे कर्ज श्रीकृष्ण शैक्षणिक संस्थेच्या नावाने काढले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहे. जिल्हा बँकेसह बुलढाणा बँकेचे कर्ज त्यांनी वेळेवर फेडलेले नाही. मजुरांच्या पैशातही गैरव्यवहार केला. कायद्याचा भंग करून २६ लाख रुपये प्रतिमाह भाड्याने प्रशासनाला इमारत दिली आहे. याकारणाने, देवकर कोणत्याही पक्षात गेले तरी एक दिवस तुरुंगात जातील, असा दावा मंत्री पाटील यांनी केला आहे.