मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार गटाने बुधवारी मंत्रालयासमोरील गांधी पुतळा ते ‘रिगल थिएटर’जवळील लालबहादूर शास्त्री पुतळयापर्यंत शांतता पदयात्रा काढली. या पदयात्रेत पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुनिल भुसारा व महिला आघाडी प्रमुख रोहिणी खडसे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> घडयाळ चिन्हाबाबत १५ ऑक्टोबरला सुनावणी; चिन्हाचा वापर करण्यास मनाई करण्याची न्यायालयाला विनंती

पदयात्रा मार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गंभीर संकटात आहे. राज्याची राजकोषीय तूट १ लाख ९९ हजार १२५ कोटींवर पोहोचली असून, महसुली तूट ३ टक्केच्या वर गेली आहे. असे असतानाही, वित्त विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून महायुती सरकारने मोठया खर्चाला मंजुरी देणे सुरूच ठेवले आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. बापूंनी दाखविलेल्या मार्गावर चालत लोकांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही निश्चय केला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.