कोल्हापूर : Karnataka Elections 2023 NCP Thackrey Group बेळगावसह सीमालढ्याला पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेनेच्या भूमिकेमुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने खानापूर मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसने निपाणी मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. एकीकरण समितीने जाहीर केलेल्या ६ जागांमध्ये या दोन्ही मतदारसंघांचा समावेश असल्याने ठाकरे सेना व राष्ट्रवादीच्या सीमालढ्याच्या निष्ठेवर चर्चा सुरू झाली आहे. तर, या दोन्ही पक्षांनी सीमालढ्याच्या पाठिंब्यात कोणताही बदल झाला नसल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव मधील महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर, यमकनमर्डी व निपाणी या ६ मतदारसंघाची घोषणा केल्यानंतर अर्ज भरून उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. एकीकरण समितीमध्ये यावेळी मतभेद,फाटाफूट असा प्रकार नसल्याने अनुकूल चित्र दिसत आहे. सीमालढ्याला प्रमुख पाठिंबा देणाऱ्या पक्षांमध्ये ठाकरे सेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा उल्लेख केला जातो.

हेही वाचा >>> कर्नाटकातील भाजपच्या उत्साही नेत्यांना अमित शहा यांनी लावला चाप

राष्ट्रवादी – ठाकरे सेनेचा खोडा ?

  सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सीमालढ्याशी ५० वर्षाहून अधिक जुने नाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सातत्याने सीमावासियांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकी मध्ये ५० जागा लढवण्याचे जाहीर केले होते. पण निवडून येण्याची क्षमता असलेल्या ९ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये एकीकरण समितीने जाहीर केलेल्या निपाणी मतदारसंघातून उत्तम रावसाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी कर्नाटक राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते के. पी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला नसल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी पाटील यांच्या रूपाने कायम राहिली आहे. या दोन घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या भूमिकेवरून उलट सुलट चर्चा होत आहे.

हेही वाचा >>> माजी आमदार आशीष देशमुख यांचे तळ्यात-मळ्यात

 ठाकरे सीमावासियांसोबत

 दरम्यान, या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहण्याची भूमिका कायम असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले आहे. खानापूर मतदार संघात राष्ट्रवादीचे काम करणारे के. पी. पाटील यांनी मुंबईत अनिल देसाई यांची भेट घेऊन उमेदवारीची गळ घातल्यावर बी फॉर्म देण्यात आला. त्यावर एकीकरण समितीच्या नेत्यांनी मातोश्रीवर संवाद साधल्यावर चक्रे फिरली आणि पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याचा आदेश देण्यात आला. विहित वेळेत पोहोचू शकल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे. याच पाटील यांना बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती; हाही एक विस्मयकारक योगायोग. याप्रकरणी बेळगाव येथील ठाकरे सेनेचे सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांनी ‘ के. पी. पाटील यांचा अर्ज असला तरी शिवसेना त्यांच्या पाठीशी राहणार नाही. उलट एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ३ मे रोजी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची सभा होणार आहे. अन्य नेत्यांच्याही लवकरच सभा, रोड शो याचेही आयोजन केले आहे. सीमालढ्याला ठाकरे गटाच्या पाठिंबाच्या भूमिकेत कसलाही बदल झालेला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊतांनी ठोठावलं सीबीआयचं दार

 राष्ट्रवादीचे सिमाबांधवाना पाठबळ

  राष्ट्रवादी काँग्रेसनेही निपाणी मतदारसंघ वगळता एकीकरण समितीच्या कोणत्याही उमेदवाराविरोधात प्रचार करायचा नाही अशी भूमिका घेतली आहे. निपाणीत गेल्या २० वर्षात एकीकरण समितीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवलेली नाही. जेव्हा लढवली तेव्हाही चार आकडी मतदान मिळालेले नाही. निपाणीत एकीकरण समितीला मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने उत्तम रावसाहेब पाटील यांना रिंगणात उतरवले असल्याचे सांगितले जाते. निपाणी परिसरात शरद पवार यांचा संपर्क चांगला असल्याने आणि उत्तम पाटील यांच्या बांधणीमुळे राष्ट्रवादी येथे खाते उघडू शकते, असा दावा पक्ष करीत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अभियंता सेल प्रमुख अमित देसाई यांनी सांगितले की, सीमावासियांना ताकद देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेत बदल झालेला नाही. सीमाभागात राष्ट्रवादीचे नेते प्रचार करताना दिसतील. कर्नाटकात पक्षाला चांगली मते मिळतील. भाजप हा मुख्य विरोधक असेल.

 राष्ट्रवादी – ठाकरे सेना एकत्र?

 एकीकरण समितीने सहा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा पदाधिकाऱ्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी देण्यात आल्याचेही सांगण्यात येते. या पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेनेमध्ये पडद्याआड बऱ्याच घटना घडल्याचे मुंबईतील घडामोडी सांगतात. यामुळे एकीकरण समितीच्या प्रचारासाठी जयंत पाटील, संजय राऊत, आमदार रोहित पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ आदीच्या सभांचे आयोजन केल्याचेही वृत्त आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp thackeray sena candidature creates confusion karnataka assembly elections print politics news ysh
Show comments