सिद्धेश्वर डुकरे
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला ‘जनजागर यात्रा’ २८८ विधानसभा मतदारसंघात निघणार आहे. यात्रेचा पहिला टप्पा पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थित बुधवारी (ता.४) पुणे येथे या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने या जनजागर यात्रेचे आयोजन केले असून ‘महागाई’,’बेरोजगारी’ या प्रमुख मुद्यांवर केंद्र व राज्य सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला शाखा जाब विचारणार आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी या जनजागर यात्रेत सामील होणार आहे.
राज्यातील काही महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. तेथे कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होवू शकतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विद्यमान सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटले सुरू आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हे सरकार पायउतार होवू शकते, अशी अटकळ विरोधी पक्षांकडून बांधली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी न्यायालयाचा निर्णय आल्यावर या सरकारला जावे लागणार,अशी भाकिते केली आहेत.त्यामुळे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला ऐनवेळी सामोरे जायचे तर पक्षाची तयारी हवी, या उद्देशाने या जनजागर यात्रेचे नियोजन केल्याचे राष्ट्रवादीतून सांगण्यात येते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजियाखान, प्रदेश महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांच्या पुढाकाराने तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सक्रिय सहभागाने ही जनजागर जागर यात्रा काढली जाणार आहे.पहिल्या टप्याला पुणे,ठाणे,मुंबई येथून सुरूवात होणार आहे.२२जानेवारीपर्यत पहिला टप्पा राहणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या,महिला पदाधिकारी घरोघरी जावून केंद्र व राज्य सरकार विरोधात पत्रकाचे वाटप करणार आहेत. यामध्ये महागाई, बेरोजगारी या महत्वाच्या मुद्यांसह महापुरूषांचा वारंवार केला जाणार अवमान, महापुरूषांच्या बाबत केली जाणारी अवमानजनक वक्तव्ये, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे आदी मुद्यांची पत्रके घरोघरी वाटली जाणार आहेत.
हेही वाचा… शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे भाजप अस्वस्थ
शेतमालाला भाव नसणे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळणे. ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या मुद्यांबरोबर सत्तेत असताना राष्ट्रवादी पक्षाने केलेली कामे,त्याचा जनतेला झालेला लाभ राज्यातील जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.