बुलडाणा : जिल्ह्याचे ‘पालक’ ठरवताना महायुतीने पुन्हा राजकीत धक्कातंत्राचाच वापर केला. यत्किंचितही चर्चा नसताना वाईचे आमदार मकरंद जाधव यांची बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागली. अजितदादांनी जाधव यांच्यावर मोठी जवाबदारी सोपवली. पूर्वीचे एकसंघ राष्ट्रवादीचे पालकमंत्री याबाबतीत अपयशी ठरले असताना जाधव कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकासाच्या बाबतीत अजूनही मागेच असलेल्या बुलढाणावासीयांना आता नूतन पालकमंत्री जिल्ह्याच्या नियमित संपर्कात राहतील की, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय उत्सवापुरतेच पालक ठरतील, असा प्रश्न पडला आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर नेहमीच्या अलिखित राजकीय परंपरेनुसार भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) या तीनही मित्रपक्षांची नजर होती. भाजपला या आपल्या बालेकिल्ल्यात आपलाच पालक हवा होता. सिंदखेडराजा मतदारसंघात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या पराभवाने आणि आपल्या पक्षाचे मनोज कायंदे आमदार झाल्याने जोशात असलेल्या अजितदादा आणि चमूला आपले बस्तान बसवण्यासाठी आपला पालक हवा होता. बुलढाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील उघड गटबाजी, मेहकर आणि सिंदखेडराजा मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे शक्ती कमी झाल्याने एकनाथ शिंदे यांचा बुलढाण्यावर डोळा होता. त्यांच्या मनात जळगावकर गुलाबराव पाटील यांचे नाव होते. मात्र बाजी मारली ती अजितदादांनी. भाजप आणि शिंदे गटाचे मनसुबे विफल झाले. मात्र, अजितदादांनी आमदार जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून सर्वांना धक्काच दिला.
आणखी वाचा-यवतमाळात शिवसेनाच मोठा भाऊ; नाईक बंगल्याचा अपेक्षाभंग
भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत संजय कुटे यांच्याऐवजी आकाश फुंडकर याना मंत्री केले. तेच पालकमंत्री राहतील, अशी चिन्हे असतानाच अजितदादांचा आग्रह नडला. यामुळे कामगारमंत्री फुंडकर यांना अकोला जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. मात्र एक पाऊल मागे घेणाऱ्या भाजपने त्यातही राजकीय हेतू साध्य केला. दिवं. पांडुरंग फुंडकर यांचा अकोला जिल्ह्यात असलेला प्रभाव, कुणबी समाजाचे प्राबल्य, भविष्यातील अकोला महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता ‘सर्वांना चालणारे’ फुंडकर यांना पालक करण्यात आले. यामुळे पालकमंत्री निवडीच्या राजकारणाला अनेक कांगोरे आहेत, हे उघड आहे.
आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांनी पालकत्व घेतल्याने गडचिरोलीच्या विकासाचा मार्ग सुकर?
नूतन पालकमंत्र्यांसमोर अनेक आव्हाने
नूतन पालकमंत्री मकरंद जाधव यांच्यासमक्ष अनेक आव्हाने आहेत. त्यांना सर्वप्रथम ३२ लाख जिल्हावासीयांचा विश्वास संपादन करणे आवश्यक ठरते. आपण केवळ झेंडावंदनापुरतेच पालक राहणार नाही, असा विश्वास जाधव यांना जनतेला द्यावा लागेल. नियमित भेटीतून रखडलेल्या लोणार विकास आराखडा, सिंदखेडराजा विकास आराखडा, जिगाव बृहत सिंचन प्रकल्प याला चालना द्यावी लागणार आहे. सिंदखेडराजापुरत मर्यादित आपल्या पक्षाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात करण्याचे अजितदादांचे मनसुबे आहेत. शरद पवारांचेही तेच मनसुबे होते. मात्र, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, मनोहर नाईक हे दिग्गजही यात कमी पडले होते. अजितदादांच्या अपेक्षांवर खरे उतरणे हे जाधव यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.