Neelam Gorhe : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनातल्या मुलाखतीत एक वक्तव्य केलं. हे वक्तव्य अर्थातच उद्धव ठाकरेंबाबत होतं. या वक्तव्याचे पडसाद इतके तीव्र उमटतील याती बहुदा त्यांनाही कल्पना नसेल. पण तसं घडलं खरं. कारण त्यांच्या दिल्लीतल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण हे शब्दशः ढवळून निघालं. नेमकं त्या काय म्हणाल्या होत्या? त्याचे पडसाद कसे उमटले? जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलम गोऱ्हे यांनी काय वक्तव्य केलं होतं?

“कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली.” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या. यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही नीलम गोऱ्हेंवर टीका केली.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“दाखवा ना मला मर्सिडिज कुठे आहेत? हे असले गयेगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. राजकारणात त्यांनी चांगभलं केलं आहे. ते तसंच रहावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना उत्तर दिलं आहे. तसंच स्वतः मर्सिडिजमधून फिरतात मग लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाहीत? हे त्या का बघत नाहीत?” असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना विचारला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले की, “जर नीलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंनी चारवेळा आमदार केलं आहे तर मग त्यांनी उद्धव ठाकरेंना आठ मर्सिडिज दिल्या आहेत का? त्या दिल्या असतील तर त्याच्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी.” असं म्हणत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना टोला लगावला आहे.

सुषमा अंधारेंचं वक्तव्य काय?

“नीलम गोऱ्हे ३० वर्षे ज्या पक्षात राहिल्या तिथे असं काही होत असेल तर नीलम गोऱ्हे यांनी एवढा पैसा कुठे ठेवला आहे? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण ‘मातोश्री’वर (शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) त्यांच्याइतकं दुसरा कोणताही माणूस वावरत नव्हता. त्या मातोश्रीवरच असायच्या. त्यांनी कुठे-कुठे संपत्ती घेतली? परदेशात किती पैसे गुंतवले? या प्रश्नांची उत्तरं नीलम गोऱ्हे यांनी द्यायला हवीत. त्यांनी शिवसेनेला (ठाकरे) प्रश्न विचारलेत मात्र, जाब हा बरोबरीच्या माणसाला द्यायचा असतो. अशा चापलुशा, बदमाशी करून व मर्जी मिळवून पद मिळवणाऱ्या लोकांना जाब विचारून अथवा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांची उंची वाढवायची नसते. नीलम गोऱ्हे चार वेळा आमदार असल्या काय किंवा विधानसभेवर असल्या काय, आमच्या नजरेत त्या बदमाश व गद्दारच आहेत.” शिवसेनेकडून अशी टीका सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. विशेषतः जे साहित्यिक आहेत, या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारण्यांनी आमच्या स्टेजवर येऊ नये किंवा तसे त्यांचे नेहमी वक्तव्य असते. त्यांनीही पार्टी लाईन्सवरच्या कमेंट्स करणे योग्य नाही, त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात, असं माझं मत आहे. तसेच नीलम गोऱ्हे या त्या पक्षात होत्या, त्या पक्षामध्ये काय चालतं होतं, मला माहीत नाही..” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी तर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं असं म्हटलं आहे.

शरद पवारांचं नीलम गोऱ्हेंबाबत काय भाष्य?

नीलम गोऱ्हे यांनी जे भाष्य साहित्य संमेलनात केलं त्याची काही आवश्यकता नव्हती. नीलम गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी मिळाली आहे. त्यांना या चारही टर्म कशा मिळाल्या या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी मला वाटतं कुठल्याश्या कारचा उल्लेख केला तो करायला नको होता. नीलम गोऱ्हे यांनी असं बोलायला नको होतं. नीलम गोऱ्हे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होत्या. त्यानंतर त्या शिवसेनेत होत्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्या काम करत होत्या. त्यानंतर आता हल्ली त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. एका मर्यादित कालावधीत त्या जवळपास चार पक्षांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यांचा जो काही अनुभव लक्षात करायला त्यांनी ते भाष्य केलं नसतं तर योग्य ठरलं असतं. नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं. यापेक्षा जास्त मी काहीही बोलणार नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलंय.

नीलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केलं. त्यावरुन महाराष्ट्रात अशा राजकीय प्रतिक्रिया पाहण्यास मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना त्या अस्वस्थ झाल्या होत्या. तिथली घुसमट सहन न झाल्याने त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. साहित्य संमेलनात मुलाखती दरम्यान केलेल्या त्यांच्या वक्तव्याचे हे असे पडसाद उमटले हे मात्र वास्तव आहे.