नेताजी सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी कधीही सहमत नव्हते. ते अनेकदा संघाच्या भूमिकांवर टीका करत असत असं वक्तव्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी केलं आहे. जर्मनीहून दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जयंती अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते आहे. अशात अनिता बोस यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आज असते तर त्यांनी भाजपा आणि संघावर टीकाच केली असती. तसंच या सरकारने त्यांचा सन्मानाही केला नसता असंही अनिता बोस यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे अनिता बोस यांनी?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करून काही प्रमाणात स्वार्थ साधण्याचं काम भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केलं जातं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी पूर्णपणे भिन्न होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना हिंदू धर्मा विषयी आदर होता. मात्र इतर धर्मांचाही ते तेवढाच आदर करत होते असंही अनिता बोस यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अनिता बोस यांनी ही आपली भूमिका मांडली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे डाव्या विचारसरणीचे नेते
तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे डाव्या विचारसरणीचे होते. भाजपा आणि संघातली मंडळी ही उजव्या विचारसरणीतली आहेत. मात्र नेताजींना त्यांचे विचार पटले नाहीत अनेकदा नेताजींनी त्यांच्या भूमिकांवर टीकाही केली आहे असंही अनिता बोस यांनी म्हटलं आहे.
नेताजींची विचारधारा भाजपा किंवा संघाच्या विचारसरणीत नाही
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची विचारधारा भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीत आढळत नाही. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर काँग्रेसने नेताजींबाबतचं एक विशिष्ट धोरण निश्चित केलं होतं. सविनय कायदेभंग चळवळीमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. मात्र भाजपाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या विविध फाईल्स समोर आणल्या त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात दिलेलं योगदान समोर आलं. नेताजी आजही असते तर त्यांनी संघ आणि भाजपावर टीका केली असती तसंच या सरकारने त्यांचा सन्मान केला असता असंही अनिता बोस यांनी म्हटलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संघावर टीका केल्याचं उदाहरण मी आत्ता देऊ शकत नाही पण त्यांचा संघाविषयीचा नेमका विचार काय होता हे मला माहित आहे असंही अनिता बोस यांनी म्हटलं आहे.