एमआयएम पक्षाला बिहारमध्ये रोखण्यासाठी काँग्रेसने आपल्या नेतृत्वात बदल केला आहे. कटिहार जिल्ह्यातील कडवा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आणि जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष शकील अहमद खान यांना काँग्रेसने विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून घोषित केले आहे. भागलपूरचे आमदार अजित शर्मा यांना हटवून खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवटच्या वेळी २००० साली काँग्रेसने फुरकान अन्सारी या मुस्लीम नेत्यावर ही जबाबदारी सोपविली होती. बिहारमधील सीमांचर प्रदेशात मुस्लीम बहुल मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी काँग्रेसकडून खान यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. मागच्या अडीच दशकापासून खान सीमांचल प्रदेशात चांगले सक्रीय आहेत. कटिहार, पुर्निया, अरारीया आणि काशीगंज हे जिल्हे येतात.
१९९२ साली खान यांनी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यावेळी ते सीपीआय (एम) या पक्षाशी संलग्न असलेल्या स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या संघटनेत होते. त्यांनी १९९९ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कटिहार जिल्ह्यातील कडवा मतदारसंघातून २०१५ दोनदा त्यांनी विजय मिळवला आहे. तेव्हापासून त्यांना आतापर्यंत काँग्रेसने कोणतेही पद दिले नव्हते. काँग्रेसच्या पक्षाच्या सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेससला सांगितले की, खान यांना विधिमंडळ पक्षनेते नेमण्यामागे दोन कारणे आहेत. एकतर सीमांचल भागात त्यांचा असलेला दबदबा आणि दुसरे म्हणजे बिहारमधील विविध जातीय ग्रुपमध्ये संतुलन राखणे.
हे वाचा >> अमेरिकन यूट्यूबर म्हणे, ”चलो भाई, वापस बिहार चलते है!” कारण ऐकून चक्रावले लोक, म्हणाले,”…
“सीमांचलच्या राजकारणात नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसने खान यांच्यासारख्या नेत्यावर जबाबदारी टाकून मोठी खेळी केली आहे. एआयएमआयएम (AIMIM) पक्षाने या प्रदेशात हातपाय पसरायला सुरूवात केली होती. एमआयएम आणि ओवैसी यांचा प्रभाव निष्प्रभ करेल असा नेता काँग्रेसला हवा होता. काँग्रेस पक्षाला किशनगंज येथे चांगला पाठिंबा आहे. खान यांच्याकडे जबाबदारी दिल्यामुळे सीमांचल प्रातांतही आम्हाला बळ मिळेल. आम्हाला संपूर्ण बिहार राज्यासाठी एक मुस्लीम नेतृत्व हवे होते.”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्याने दिली.
राज्यसभेचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह (उच्चजातीय ब्राह्मण नेते) यांना मागच्यावर्षी बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद दिल्यानंतर भूमिहार नेते शर्मा यांना अधिक काळ विधिमंडळ पक्षनेतेपदी ठेवले जाणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर खान म्हणाले की, सीमांचल आणि संपूर्ण बिहार राज्याचे प्रश्न विधानसभा सभागृह आणि सभागृहाबाहेरही उचलण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल.