एकेकाळी उत्तरप्रदेशच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीचा ( बसपा ) दबदबा होता. मात्र, मागील तीन विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने सपाटून मार खाल्ला आहे. बसपाच्या सर्वेसर्वो मायावतीही राज्याच्या राजकारणात सक्रीय नसल्याची चुणूक २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आली. त्यातच आता २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बसपा कामाला लागल्याचं दिसत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी ( १९ ऑक्टोंबर ) बसपाने समाजवादी पार्टीला ( सपा ) एक धक्का दिला आहे. सपाचे नेते इम्रान मसूद यांनी बसपात प्रवेश केला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या इम्रान मसूद यांच्या पाठीमागे मुस्लीम मतदारांची मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर पश्चिम विभागाच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : दिल्लीत बंदी असताना आप मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; भाजपा म्हणाली, “केजरीवाल हिंदू विरोधी…”

२०२२ साली उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाला मुस्लीम समुदायाने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं समोर आलं. त्यानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच कित्ता काँग्रेसनेही गिरवला आहे. बसपाचे माजी नेते आणि नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सिद्दीकी यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

कोण आहेत इम्रान मसूद?

माजी खासदार रशीद मसूद यांचे पुतणे असलेल्या इम्रान मसूद यांनी २००७ साली मुझफ्फराबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. २०१२ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते राहुल गांधींच्या जवळचे युवा नेते म्हणून ओळखले जात होते. इम्रान मसूद यांनी २०१२ आणि २०१७ साली सहानपूरमधील नकूर विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा : जयललिता मृत्यू चौकशी अहवाल : कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार, शशिकला यांनी सर्व आरोप फेटाळले

भाजपा आणि आरएसएसवर आरोप

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मसूद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत आले होते. २०१३ साली मुझफ्फरनगमध्ये झालेल्या दंगलीसाठी त्यांनी भाजपा आणि आरएसएसवर आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यावर द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. २०१४ साली काँग्रेसकडून मसूद लोकसभा निवडणुकीसाठी उभारले होते. मात्र, भाजपाच्या उमेदवाराने मसूद यांचा पराभव केला होता. तरीही मुस्लीम समुदायामध्ये त्यांची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर होती. २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मसूद यांनी सपात प्रवेश केला. मात्र, ते बरेच दिवस पक्षावर नाराज असल्याचं दिसत होते.

“…तर बसपाने सरकार स्थापन केलं असतं”

बसपात प्रवेश केल्यानंतर इम्रान मसूद यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला बोलताना सपावर टीकेचे ‘बाण’ सोडले आहेत. “मुस्लीम समुदायाने सपाला एकगठ्ठा मतदान केलं होते. पण, तरीही सपा सरकार स्थापन करू शकली नाही. जर मुस्लीम समुदायाची मते बसपाला पडली असती तर, तर त्यांनी सरकार स्थापन केलं असतं. मुस्लीम समाजाला न्याय मिळेल, या भावनेने मी सपात प्रवेश केला होता. मात्र, ते मुस्लिम आणि मागासवर्गीय घटकांना न्याय देऊ शकले नाही.”

हेही वाचा : “सिंगूरमधून टाटांना बाहेरचा रस्ता मी नाही…”; ‘नॅनो’ प्रकल्पावरुन ममता बॅनर्जींचा विरोधकांवर आरोप

“सपाला ताकद मिळाली की, भाजपा…”

“उत्तरप्रदेशमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मुस्लीम आणि दलित समाज बसपाच्या पाठिशी उभा राहिल. जनतेचा बसपावर विश्वास आहे. ज्या ज्या वेळी सपाला ताकद मिळाली, तेव्हा राज्यात भाजपा मजबूत झाला. जेव्हा बसपा राज्यात शक्तिशाली झाली, तेव्हा भाजपा कमकुवत झाला,” असेही इम्रान मसूद यांनी नमूद केलं.

Story img Loader