दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : तीन पक्षाने एकत्रित येऊन सत्तास्थापन करण्याचा महाराष्ट्र राज्यातील दुसरा प्रयोग रंगात आला असताना त्यामध्ये सत्ता अंतर्गत संघर्षाची पहिली ठिणगी कोल्हापुरात पडली आहे. कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांचे मतदारसंघातील राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणूक लढवून जिंकण्याचा निर्धार बुधवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवला. आगामी निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रित लढतील अशी शक्यता जाणवत असतानाच आपल्याच सत्तेतील मित्र पक्षाविरोधात निवडणूक लढण्याचा प्रकार या निमित्ताने पुढे आला असून राज्यातील नव्या सत्तासंकरात हा ‘कागल पॅटर्न’ सत्ताधाऱ्यात संघर्षाची बीजारोपण करणारा ठरला आहे.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सत्तेचे त्रैराशिक जन्माला आले. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यामध्ये बदल होऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आकाराला आली. सत्तेचे वर्ष पूर्ण होत असताना आता शिंदे सेना, भाजप यांच्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने नवा भिडू मिळाला असल्याने तीन पक्षाच्या सरकारचे नवे त्रैराशिक पुन्हा आकाराला आले आहे.

हेही वाचा… शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीत रायगड महत्वाच्या भूमिकेत

पक्ष दुय्यम- गट महत्वाचा

हे तिन्ही मित्र पक्ष आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांना एकत्रितपणे लढवणार असे चित्र दिसत आहे. मात्र, सत्ता स्थापन होऊन चार दिवस होण्याआधीच आगामी निवडणुकीवरून सत्ताधारी गटामध्ये बेबनाव होऊ लागला आहे. याची पहिली झलक कागलमध्ये आज पाहायला मिळाली. कागल तालुक्याचे राजकारण हे कायम गटातटाचे राहिले आहे. सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह राजे घाटगे हे दिवंगत नेते संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, संजय घाटगे, समरजित घाटगे यांच्या गटा-तटाभोवतीच राजकारण फिरत राहिले आहे. परिणामी पक्ष हा इथे कायम दुय्यम स्थानी राहिला आहे. मुश्रीफ यांनी शरद निष्ठेला तिलांजली देऊन अजितदादांशी हातमिळवणी केली असल्याने तालुक्यातील सगळी राष्ट्रवादी तिकडेच सामावली आहे.

हेही वाचा… अजित पवारांना ७५ वर्षांचे छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर कसे चालतात ?

सत्तेतील पक्षात संघर्षाची झलक

शिवाय आता कागल तालुक्याची राष्ट्रवादी सत्तेचा घटक बनली आहे. याचा परिणाम तालुक्याच्या राजकारणावर होणे स्वाभाविक होते. मुश्रीफ मंत्री होताच समरजित घाटगे नॉट रिचेबल झाले. ते चार दिवसानंतर आजच उगवले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भावना व्यक्त करीत ‘कागल मतदार संघाची आगामी निवडणूक लढणार आणि विक्रमी मताधिक्याने जिंकणार’ असा निर्धार व्यक्त केला. त्यापूर्वी त्यांनी आपली देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे, असे त्यांनी सांगून टाकले. यातील भावार्थ पाहता फडणवीस यांनी घाटगे यांना निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच सत्तेत राहायचे आणि सत्तेतील घटक पक्षांना शह द्यायचा अशी छुपी रणनीती असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. कागल तालुक्यात याची सुरुवात झाली असून नव्या सरकारसाठी हा सूचक धोक्याचा इशारा असू शकतो.

हेही वाचा… Maharashtra Political News Live : पंकजा मुंडेंची पत्रकार परिषद, मोठा निर्णय घेणार?

मुश्रीफ मंत्री ; घाटगे कोंडीत

मुश्रीफ हे मंत्री झाल्याने घाटगे यांची बऱ्याच प्रमाणात कोंडी होणार आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांचे निवासस्थान, दोन्ही साखर कारखाने, जिल्हा बँक याची ईडीकरवी चौकशी सुरू झाली. घाटगे यांनी देखील मुश्रीफ यांच्या आर्थिक व्यवहारावरून आरोपाच्या फैरी झाडल्या. राष्ट्रवादी सत्तेचा घटक बनल्याने आता मुश्रीफ यांची चौकशी लावण्याच थंडावण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे घाटगे यांनी उपस्थित केलेले प्रश्न बासनात जाणार की काय अशी चर्चा आहे. खेरीज, मुश्रीफ सत्तेचा भाग असल्याने त्यांच्या विरोधात थेट बोलणेही राजकीयदृष्ट्या घाटगे यांना अडचणीचे जाऊ शकते. या माध्यमातून घाटगे यांची कोंडी होणार आहे. मुश्रीफ यांच्या विरोधात लढताना यापुढे घाटगे यांना आयुधे बदलावी लागणार आहेत. बदललेल्या परिस्थितून मार्ग काढून नवी रणनीती आखणे हेही घाटगे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. ‘कागल मध्ये भगवा फडकवायचा आहे’ असे म्हणत घाटगे यांनी कट्टर हिंदुत्वाचा साद घालत आगामी भूमिकेचे दर्शन घडवले आहे. तर त्याला शह देण्यासाठी मुश्रीफ कोणती पावले टाकणार हेही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New election pattern of kagal will be repeated elsewhere in state print politics news asj