छत्रपती संभाजीनगर : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे नवे पालकमंत्री अजित पावर हे उद्या बीडच्या दौऱ्यावर येत आहेत. राजकीय परिस्थिती लक्षात घेता अजितदादांच्या या दौऱ्याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी अलिकडेच बरखास्त केल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड, नावांची चाचपणी करताना मात्र, सावध पाऊले टाकली जात आहेत. अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात कार्यकारिणीबाबत नावांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येते.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याचे नाव समोर आले. त्यानंतर पक्षाकडून चाटेची तातडीने हकालपट्टी करण्यात आली होती. चाटेची केज तालुकाध्यक्षपदावर दोन कोटींच्या गुन्ह्यात आणि मकोका लावण्यात आलेला आरोपी वाल्मीक कराडच्या शिफारशीवरून नियुक्ती झाल्याची पक्षात चर्चा तेव्हा सुरू होती. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे मानले जात होते. त्यामुळे तातडीने बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्याला तीन आठवडे उलटले असून, नवे पदाधिकारी शिर्डीच्या पक्षाच्या अधिवेशनानंतर निवडले जाते जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यालाही आता आठवडा उलटत आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्यापुढे नवीन कार्यकारिणी निवडताना जे काही चेहरे निश्चित करण्यात येत आहेत, त्यांच्या नावांची यादी समोर ठेवली जाणार असल्याची माहिती आहे.

परळीविषयी उत्सुकता

परळी तालुका कार्यकारिणी निवडीविषयी जिल्ह्यातच उत्सुकता आहे. नव्या कार्यकारिणीत एखाद-दुसरा नवा चेहरा दिसू शकतो. बाकी सदस्य कदाचित पूर्वीचेच राहतील. परळीची कार्यकारिणी निवडताना धनंजय मुंडेंचाच प्रभाव राहील. मात्र, जिल्ह्याची कार्यकारिणी निवडताना मुंडे समर्थकांपैकी किती जणांना स्थान मिळते, याविषयीची उत्सुकता आहे.

पक्षाची जिल्हा कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा, विचारविनिमय सुरू आहे. २६ जानेवारीच्या ध्वजारोहणासाठी बीडला आलेले युवक व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनीही निवडण्यात येणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांच्या नावाचा आढावा घेतला. ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांच्याशीही चर्चा सुरू आहे. प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेचे कार्यकर्ते आणि पक्ष वाढीसाठी झोकून देऊन काम करणाऱ्यांचा विचार केला जात आहे. -राजेश्वर चव्हाण, जिल्हाध्यक्ष

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New guardian minister ajit pawar is visiting beed tomorrow print politics news mrj