काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस खासदार शशी थरूर याचं भवितव्य मतदान पेटीत कैद झालं. २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी निवडणूक लढवली आहे. अध्यक्षपदाची सूत्रे बिगरगांधी नेत्याकडे गेल्याने काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाचं महत्त्व कमी होईल किंवा त्यांच्या शब्दाला फार किंमत राहणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या सर्व चर्चांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसमध्ये नवीन अध्यक्षाच्या निवडीमुळे गांधी कुटुंबाचा आवाज कमी होणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय नवीन अध्यक्षाने काँग्रेसची सूत्रं हाती घेतल्यानंतरही गांधी कुटुंबाकडून त्यांना नियंत्रित केलं जाईल, हे गृहितकही चिदंबरम यांनी फेटाळून लावलं आहे. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी ही माहिती दिली आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका करण्यात आली होती. यामुळे दुखावलेल्या गांधी कुटुंबानं निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. यामुळे गैर-गांधी नेत्याला काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेण्याची वेळ आली, असा दावाही चिदंबरम यांनी केला.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह देशातील सुमारे नऊ हजार काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यापैकी एकाची निवड करण्यासाठी मतदान केलं. गांधी परिवारातून या निवडणुकीसाठी कुणीही उभं राहिलं नसलं तरी अध्यक्ष म्हणून खरगे यांनाच जास्त पसंती मिळाल्याचं दिसून आलं. नवीन अध्यक्षाचं नियंत्रण गांधी परिवाराकडून केलं जाईल, याबाबतची चर्चा चिदंबरम यांनी फेटाळून लावली. पण मोठ्या निर्णयांसाठी नवीन अध्यक्षांना गांधी कुटुंबाचं मत ऐकावं लागेल, ही बाब चिदंबरम यांनी मान्य केली.