भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी जालना जिल्ह्यातील परतूर येथील राहुल लोणीकर यांची नियुक्ती झाली आहे. माजी पाणीपुरवठामंत्री आणि परतूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांचे ते चिरंजीव आहेत. वडील बबनराव लोणीकर यांच्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण केल्यापासूनच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा, लोकसभा इत्यादी निवडणुकांशी त्यांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या संबंध राहिलेला आहे.
हेही वाचा- शिवसेनेत ‘ दोन अनिल ‘ न्यायालयीन लढाईत आघाडीवर
लोणावळा येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुल लोणीकर यांना घरातील वातावरणातच राजकारणाचे प्राथमिक धडे मिळाले. २००४ मध्ये ते पंचायत समिती सदस्यपदी निवडून आले आणि त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. २००६ मध्ये परतूर पंचायत समितीच्या सभापतिपदी आणि २००८ मध्ये याच संस्थेच्या उपसभापतीपदी ते निवडून आले. २०१२ आणि २०१७ मध्ये जालना जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेल्या राहुल लोणीकर यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदीही निवड झाली होती.
हेही वाचा- पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे ‘मोठे मासे’ ‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या गळाला?
वडील बबनराव लोणीकर यांच्याप्रमाणेच राहुल यांनीही विविध आंदोलनात भाग घेतलेला आहे. परतूर येथील बीएसएनएल सेवा सुरळीत करण्यासाठी त्यांनी जालना येथील दूरसंचार कार्यालयावर आंदोलन केले होते. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्काच्या सवलतीची सुविधा कायम ठेवावी, ग्रामसेवक भरतीमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य द्यावे इत्यादींसाठी त्यांनी आंदोलने केली. वडील बबनराव लोणीकर यांनी लढविलेल्या विधानसभा निवडणुकांत प्रचारात ते अग्रभागी राहिलेले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी ते याच संघटनेत प्रदेश महामंत्री होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या जालना अध्यक्षपदावरही ते राहिलेले आहेत.
हेही वाचा- पक्षांतर्गत कोंडीमुळे अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडले….
राहुल लोणीकर हे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले युवक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. त्यांच्या या महत्त्वाकांक्षेस वडिलांची साथ आहे. २०१७ मध्ये दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आल्यावर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु जिल्ह्यातील राजकीय गणितामध्ये त्यांच्या बहुमताची बेरीज होऊ शकली नाही आणि त्यांची ही संधी हातातून गेली. वडील बबनराव लोणीकर आतापर्यंत तीन वेळा परतूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि पुढेही विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार असतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून असणाऱ्या राहुल लोणीकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळणे असंभव आहे.
हेही वाचा- महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीविराेधात मनविसेचा नवा अजेंडा; अमित ठाकरेंचा दौरा तरुणाईत चर्चेत
अशा राजकीय परिस्थितीत राहुल लोणीकर यांचे लक्ष परभणी लोकसभेच्या उमेदवारीवर असल्याचे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मानले जाते. जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश परभणी लोकसभा मतदारसंघात होतो. जालना जिल्ह्यातील जवळपास ४० टक्के भाग परभणी लोकसभा मतदारसंघात असल्याने तेथून आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळावी ही राहुल लोणीकर यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. बबनराव लोणीकर जेव्हा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी भाजपने पक्षीय पातळीवर सोपविली होती. त्यामुळे बबनराव आणि राहुल लोणीकर दोघांनीही या काळात परभणी जिल्ह्यातील संपर्क अधिक वाढविण्यावर भर दिला.
हेही वाचा- मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत बच्चू कडू राजकीयदृष्ट्या हतबल
राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची सत्ता आल्यावर बबनराव लोणीकर यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. परंतु त्यांच्या वाट्यास निराशाच आली. या परिस्थितीत बबनराव लोणीकर यांच्या समर्थकांत नाराजी आहे. परंतु ती प्रत्यक्ष व्यक्त मात्र होत नाही. आता राहुल लोणीकर यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करून ही नाराजी कमी करण्याचा प्रयत्न भाजप पक्षनेतृत्वाने केली असावा, असेच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मानले जात आहे.