सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : ऊसतोडणी दराबाबतचा तीन वर्षांचा करार संपल्याने नव्याने किमान ७० टक्के दरवाढीबाबत येत्या काळात पंकजा मुंडे आणि राज्य साखर संघाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांच्यादरम्यान चर्चा होईल, असे तोडणी मजूर संघटनेला वाटते. मात्र, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील बहुसंख्य साखर कारखानदार अजित पवार यांच्या बाजूने असल्याने या चर्चेला आता पाय फुटतील असे सांगण्यात येत आहे. दराबाबतच्या चर्चेचा लवाद म्हणून दिलीप वळसे पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा होईल आणि त्यानंतर दरबाबतच्या अंतिम निर्णयासाठी शरद पवार यांची मंजुरी घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
तीन वर्षांपासून लहान वाहनाचा उसतोडणीचा दर २३७ तर मोठ्या वाहनाचा २७३ रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. गुजरातमध्ये सध्या तोडणी वाहतुकीचा दर ४७६ रुपये प्रतिक्विंटल एवढा अधिक आहे. त्यामुळे या दरात ७० टक्के वाढ करावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्यावतीने गोरख रसाळ यांनी केली आहे. येत्या काळात दरांबाबतची ही चर्चा पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यामध्ये होऊ शकेल असे त्यांना वाटते. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी तोडणी दर वाढवून मिळायला पाहिजे, अशी आग्रही मांडणी केली. त्यानंतर ऊस तोडणी आणि वाहतूक दर वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्यांची ही मागणी मजूर कारखान्यावर पोहचत असताना पुढे आली आहे. कर्नाटकातील साखर कारखान्याच्या गाळपास २५ ऑक्टोबरपासून सुरुवात करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने बीड जिल्ह्यातील काही मजूर कर्नाटकाच्या दिशेने निघाले आहेत. राज्यातील साखर कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपनाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. १ नोव्हेंबरपासून गाळप हंगामास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील चार ते साडेचार लाख मजूर स्थलांतर करू लागला आहे. अशा काळात पुन्हा एकदा दरवाढीची मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. उस दरवाढीबाबतची ही चर्चा पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यामध्ये होईल, असे मजूर संघटनांना वाटते. मात्र, राज्यातील बहुसंख्य साखर कारखानदार अजित पवार यांचे पाठीराखे आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यातील दरबाबतच्या चर्चेला नवे पाय फुटतील असे सांगण्यात येत आहे. ऊसतोडणी महामंडळ सुरू करण्यापासून ते त्यासाठी थोडासा निधी देण्यापर्यंतची कार्यवाही धनंजय मुंडे यांच्या काळात झाली. त्यामुळे दराबाबतच्या या चर्चेत त्यांचे स्थान काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा… ऊसदराचे राजकारण पेटले; पश्चिम महाराष्ट्रातील हंगामावर आंदोलनाची पडछाया
हेही वाचा… भाजपच्या मोर्चेबांधणीमुळे रायगडमध्ये तटकरे अस्वस्थ
मजुरीचे दर हा साखर कारखान्यांच्या अर्थचक्रात फार मोठा वाटा नसतो, त्यामुळे यात राजकारण होणार नाही, असेही तोडणी मजूर संघटनेच्या गोरख रसाळ यांना वाटते. मात्र, काही चर्चा झाल्या असतील, त्यामुळेच दर वाढवून घेण्याचे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिल्याचेही ते सांगतात. दरम्यान राज्य साखर संघाकडे सहा संघटनांनी दरबाबतचे अर्ज केले आहेत. तर एका संघटनेने धनंजय मुंडे यांच्याकडे अर्ज केला आहे. त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. मात्र, या अनुषंगाने सप्टेंबरमध्ये एक प्राथमिक बैठक झाली असल्याचे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.