पंजाब, हिमाचल प्रदेश, केंद्रशासित प्रदेश चंदीगढ आणि अमृतसरमधील दरबार साहिब या गुरुद्वारांचे प्रशासक म्हणून काम करणारी यंत्रणा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (SGPC) निवडणुकीत माजी अध्यक्षा बीबी जागीर कौर यांनी आपले स्वतःचे पॅनल उभे करण्याची घोषणा केली आहे. शिरोमणी अकाली पंथ या नव्या पॅनलची घोषणा करून बीबी जागीर कौर म्हणाल्या की, SGPC ला आता एका कुटुंबाच्या (बादल परिवार) नियंत्रणातून मुक्त करण्याची वेळ आली आहे. जागीर कौर यांनी एसजीपीसीची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांची अकाली दलातून हकालपट्टी करण्यात आली होती. अकाली दलाने पाचव्यांदा त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याला विरोध केल्यानंतर कौर यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. कौर यांनी अकाली दलामधील ‘बंद लिफाफा’ संस्कृतीवर जोरदार टीका केली. एसजीपीसीचा अध्यक्ष कोण होणार, हे अकाली दलाचे वरिष्ठ ठरवितात, असाही आरोप त्यांनी केला.
अकाली दलाची राजकीय परिस्थिती सध्या डळमळीत असताना जागीर कौर यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी आणखी त्रासदायक ठरू शकतो. काही दिवसांपूर्वीच अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाश सिंग बादल यांचे निधन झाले. एसजीपीसीच्या निवडणुका दर चार वर्षांनी लागणे अपेक्षित आहे, मात्र २०११ पासून याच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने बीबी जागीर कौर यांची मुलाखत घेतली. त्याचा संपादित अंश प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पुढीलप्रमाणे…
शिरोमणी अकाली पंथ स्थापन करण्यामागचा हेतू काय?
कौर : या पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व शीख बांधवांना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची निवडणूक लढविण्याची संधी देत आहोत. बरेच जण आतापर्यंत अपक्ष लढत होते. एसजीपीसीला अकाली दलाकडून नियंत्रित करण्यात येते. समितीवरील बऱ्याच जागा अकाली दलाकडून भरण्यात येतात. मतदार अपक्ष उमेदवारांना फारसा पाठिंबा देत नाहीत. त्यामुळे मी हे नवे माध्यम तयार केले आहे. ज्यामध्ये सर्व शिखांना संधी मिळेल. मग त्यात काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि भाजपाचेही लोक सहभागी होऊ शकतील.
एसजीपीसीमध्ये सर्वपक्षीय लोकांचे प्रतिनिधित्व असावे, कोणत्याही एका कुटुंबाकडून याचा कारभार चालू नये, असे मला वाटते. अकाली दलातून अधिकतर सदस्य एसजीपीसीच्या समितीमध्ये असल्यामुळे एकाच पक्षाचे तिथे चालते. एसजीपीसीने सर्व शीख बांधवांना एकत्र आणून एक कब्झा (नियंत्रण) केला पाहिजे. त्यासाठीच शिरोमणी अकाली पंथ स्थापन करण्यात आला आहे.
शिरोमणी अकाली पंथ फक्त एसजीपीसीची निवडणूक लढविणार की मुख्य राजकारणातही उतरणार?
कौर : सध्या तरी एसजीपीसीच्या निवडणुकीवर आमचे लक्ष लागले आहे. मुख्य प्रवाहातील राजकारणाबाबत नंतर निर्णय घेतला जाईल.
याआधी अनेक ज्येष्ठ नेते अकाली दलातून बाहेर पडून त्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण यशस्वी होऊ शकले नाहीत. तुम्ही हे आव्हान कसे पेलणार?
कौर : गतकाळात अकाली दलातून जे नेते बाहेर पडले, त्यांची कारणे मुख्यत्वे राजकीय होती. मी ज्या कारणासाठी बाहेर पडले, ते फक्त एसजीपीसीच्या निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे. मागच्या काळात तडजोड केली गेली. ज्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले नव्हते, त्यांची एसजीपीसीमध्ये सोय करण्यात आली. आम्ही ही तडजोड बंद करणार आहोत. एसजीपीसीची ही राजकीय संघटना न राहता ती शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना व्हावी, असे आमचे मत आहे.
तुम्ही स्वतः चार वेळा एसजीपीसीच्या अध्यक्ष राहिला आहात. तुम्ही लिफाफा संस्कृतीमधून नव्हता आला का?
कौर : हो, त्या संस्कृतीमधूनच माझी निवड झाली, हे सांगायला मला कमीपणा वाटत नाही. पण ती पद्धत चुकीची होती, हेदेखील मी सांगते. त्याचा शेवट करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे.