Lok Sabha Speaker पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) नेते ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाद्वारे १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार, काँग्रेसचे आठ वेळा खासदार राहिलेले कोडिकुनिल सुरेश यांचा आवाजी मतदानाने पराभव केला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. यावेळी त्यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी १९५२, १९६७ आणि १९७६ साली लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ही चौथी वेळ होती. ही निवडणूक जिंकून भारतीय लोकसभेच्या इतिहासात सलग दोन वेळा अध्यक्षपद भूषवणार्‍या अय्यंगार आणि जीएमसी बालयोगी यांच्या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. कोण आहेत ओम बिर्ला? जाणून घेऊ.

हेही वाचा : लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींकडे कोणते अधिकार असतील?

कोण आहेत ओम बिर्ला?

बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. १९८५ मध्ये काँग्रेसचे बलराम जाखड यांच्यानंतर, कोटा लोकसभेतून सर्वोच्च पदावर पुन्हा निवडून आलेले ३९ वर्षांतील ते पहिले अध्यक्ष ठरले. ओम बिर्ला यांचा जन्म १९६२ साली झाला. १९८७ मध्ये कोटा येथील भाजपाच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

त्यांनी यापूर्वी २००३ ते २०१४ पर्यंत कोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. त्यांच्या मागील कार्यकाळात, संसदेने कोविड-१९ साथीच्या रोगाचा सामना केल्याने, ऐतिहासिक कायदे मंजूर केल्यामुळे आणि कलम ३७० रद्द केल्यामुळे लोकसभेची कार्यक्षमता सुधारली. त्यांच्या नेतृत्वाखालील २०१९ मधील पहिल्याच सत्रात सर्व प्रथमच सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली आणि पहिल्या सत्राच्या काही तासातच सदस्यांनी १,०६६ विषय उपस्थित केले होते. लोकसभेच्या इतिहासातील हा विक्रम होता.

हेही वाचा : लोकसभा उपाध्यक्ष पदाला इतके महत्त्व का? आजवर किती वेळा विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपाध्यक्षपद भूषवलं?

अनेक खासदारांनी त्यांच्या भाषणाचा कालावधी कमी केल्याबद्दल तक्रार केली असताना, बिर्ला हे पहिले अध्यक्ष होते, ज्यांनी खासदारांना त्यांच्या भाषणांच्या क्लिपिंग्स सोशल मीडियावर प्रसारित करण्याची परवानगी दिली. त्यांनी चर्चेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विधेयके किंवा धोरणांवर खासदारांसाठी ब्रीफिंग सत्रांची एक नवीन प्रणालीदेखील सुरू केली. वसाहतकालीन इमारतीतून संसदेचे नवीन इमारतीत स्थलांतर, हे बिर्ला यांच्या पहिल्या कार्यकाळातील सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly elected loksabha speakr om birla rac