आदिवासी आरक्षणासंदर्भात वरिष्ठ वकिलांना उच्च न्यायालयात सहायक म्हणून काम केलेले नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार ॲड. गोवाल आता संसदेत आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर वकिली करणार आहेत. फुटबॉलची आवड असलेले काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा दीड लाखाहून अधिक मताधिक्क्याने पराभूत करुन पहिल्याच प्रयत्नात निवडणुकीचे मैदान दणाणून सोडले. उमेदवारी जाहीर झाली असता, कोण हे गोवाल पाडवी, असा प्रश्न सर्वत्र विचारला गेला. भा क्षेत्रात असलेले महायुतीचे प्राबल्य, बहीण सुप्रिया गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, अशी सर्व सत्ताकेंद्रे असल्याने डॉ. हिना गावित तिसऱ्यांदा संसद गाठतील, असे म्हटले जात होते. परंतु, वडील के. सी. पाडवी यांचा राजकीय वारसा वगळता राजकारणापासून कोसो दूर असलेल्या गोवाल यांच्या गळ्यात पहिल्याच प्रयत्नात खासदारकीची माळ पडली.
हेही वाचा…विशाल पाटील(सांगली, अपक्ष); वसंतदादाचे वारसदार !
राजकारणातील अतिशय साधा, निर्मळ चेहरा म्हणून गोवाल यांच्याकडे पाहिले जात आहे. गोवाल यांचे लहानपणापासून मुंबईत शिक्षण झाले. वडील हे ३५ वर्षापासून अक्कलकुवा, धडगावसारख्या अतिदुर्गम भागातून आमदार म्हणून निवडून येत असले तरीही गोवाल हे बहुतांश वेळ मुंबईतच वास्तव्यास राहिले. गोवाल यांनी विधी शाखेत पदव्युतर शिक्षण पूर्ण केले. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीही केली. वडील महाविकास आघाडी सत्तेत असताना आदिवासी विकास मंत्री झाल्यानंतर गोवाल हे नंदुरबारमध्ये परतले. तेव्हापासून ते नंदुरबारमध्येच काम करू लागले. लोकसभेसाठी अचानकपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील नऊशेपेक्षा अधिक वाड्या, पाड्यांना भेटी देत त्यांनी स्वत:ची ओळख करुन देण्यासाठी मेहनत घेतली. आदिवासी आरक्षणासंदर्भात वरिष्ठ वकिलांना उच्च न्यायालयात सहायक म्हणून काम पाहिलेल्या गोवाल यांनी आता संसदेत आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर वकिली करणार, हा मुद्दा जनमानसात रुजवला. गावित परिवाराविरोधात असलेले जिल्ह्यातील नेते. १० वर्षांपासून सत्ता एकाच घराण्याकडे असल्याने विरोधी जनमत, संविधान बदलण्याची होणारी चर्चा, प्रियंका गांधी यांची प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात झालेली विशाल सभा, हे घटक गोवाल यांच्या कामी आले.