सौरभ कुलश्रेष्ठ

मतदार संघातील विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने शिवसेना आमदारांच्या निवडून येण्याचा प्रश्न निर्माण झाला होता हा शिंदे गटाचा दावा निरर्थक आहे. सत्तेत असताना निवडून येण्यात अडचणीचे कारण सांगता मग १९९९ ते २०१४ या १५ वर्षांत विरोधी पक्षात असताना कसे निवडून येत होता असा सवाल करत शिवसेनेचे नेते नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाचा युक्तिवाद फसवा असल्याची टीका केली.

शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी विकास निधी मिळण्यात अडचणी येत होत्या. आमदारांना विकास निधीच मिळाला नाही तर निवडून कसे येणार. त्यामुळे शिवसेना आमदार नाराज झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे सर्व सांगूनही त्यांनी गंभीरपणे घेतले नाही. त्यातून असंतोष निर्माण होऊन आमदारांनी उठाव केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना केली होती. शिवाय २१ जूनला शिंदे गट सूरतला गेला तेव्हापासून महाराज शिवसेना आमदार सातत्याने विकास निधी वाटपातील दुजाभाव हा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत होते. 

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मात्र विकास निधीच्या कमतरतेचा शिंदे गटाचा  युक्तिवाद खोडून काढला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्यांमध्ये मागील पंधरा ते वीस वर्षांपासून निवडून येत असलेले अनेक शिवसेना आमदार आहेत. शिवसेना १९९९ ते २०१४ या काळात विरोधी पक्षात होती. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या कामांसाठी सत्ताधारी पक्षातील आमदारांप्रमाणे निधी मिळत नाही, त्यांची अनेक कामे होत नाहीत हे जगजाहीर आहे. निवडून येण्यात केवळ विकास कामांवरील खर्चाचा मुद्दा असता तर मग या पंधरा वर्षात शिवसेनेचे हे आमदार कसे निवडून येत होते?, असा सवाल करत शिंदे गटातील आमदारांचा हा युक्तिवाद फसवा आणि निरर्थक असल्याची टीका नीलम गोऱ्हे यांनी केली. तसेच विकास कामांसाठी मिळणाऱ्या पैशांमुळे नव्हे तर शिवसेना नावाच्या ताकदीमुळे हे आमदार विरोधी पक्षात असतानाही सातत्याने निवडून येत होते, असे त्यांनी नमूद केले. 

Story img Loader