अभिमन्यु लोंढे
Nilesh Rane to Joins Eknath Shinde Shivsena Kudal Vidhan Sabha Constituency सावंतवाडी – माजी खासदार निलेश राणे तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असू शकतात. मुंबईत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभेच्या जागा वाटपात कुडाळ मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटासाठी सोडला जाणार आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे आमदार वैभव नाईक यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार नव्हता. त्यामुळे निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्याचे नियोजन महायुतीने केले आहे. खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर निलेश राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>अजित पवारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न; राजेंद्र शिंगणेंच्या तुल्यबळ उमेदवाराचा शोध
गेल्या काही वर्षापासून निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ भाजपाची बांधणी केली आहे. याचे सकारात्मक परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत दिसून आले होते. कुडाळ मतदारसंघातून खासदार नारायण राणे यांना २६ हजार १३६ मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आग्रही होते. मात्र महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने, निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन धनुष्यबाणावर निवडणूकीत उतवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>>अजित पवारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न; राजेंद्र शिंगणेंच्या तुल्यबळ उमेदवाराचा शोध
राणे यांचा बुधवारी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणे अपेक्षित आहे. निलेश राणे जवळपास वीस वर्षांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हाती घेणार आहेत. उध्दव ठाकरे याच्याशी झालेल्या मतभेदांमुळे नारायण राणे आणि त्यांची मुले आणि समर्थक आमदारांनी शिवसेनेशी फारकत घेत काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. नंतर कांग्रेस सोडून ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता कुडाळ मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने निलेश राणे निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल होणार आहेत.
कुडाळ मतदारसंघ हा नारायण राणे यांचा पारंपारीक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र सलग दोन वेळा या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक निवडून आले होते. त्यांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा तर २०१९ मध्ये भाजपच्या रणजीत देसाई यांचा पराभव केला होता. कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्याना मिळून कुडाळ मतदारसंघ तयार झाला असून यंदा बदलत्या राजकीय समिकरणामुळे मतदारसंघात शिवसेना विरुध्द शिवसेना लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.