आगामी काही महिन्यांत ९ राज्यांच्या विधानसभा आणि २०२४ साली लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून दोन दिवस भाजपाचे राष्ट्रीय मंथन सुरु झालं. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.
“पेगासस, राफेल, मनी लाँड्रिंग, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, नोटाबंदी आणि विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी भाजपाविरुद्ध सातत्याने खोटा प्रचार केला. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत अपमानास्पद भाषा वापरली. पण, ही सर्व प्रकरण न्यायालयात गेल्यावर केंद्र सरकारच्या बाजूने निकाल लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांच्या अपप्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे,” असं निर्मला सीतारमन यांनी म्हटलं.
“या बैठकीत भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तेथील संघटनाबत्मक कामाबद्दल बैठकीत माहिती देण्यात आली. कर्नाटक, त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि संबंधित राज्याचे अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते,” असं निर्मला सीतारमन यांनी सांगितलं.
हेही वाचा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा! भाजपाला रोखणं कठीण होणार?
“निवडणूक कशा जिंकायच्या याचा परिपाठ मोदींनी…”
“२०२३ मध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, मिझोराम, छत्तीसगड, मेघालय, नागालँड आणि तेलंगणा या ९ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून एकही राज्य गमावून चालणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या राज्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय ऐतिहासिक असून आघाडीवर राहून निवडणूक कशा जिंकायच्या याचा परिपाठ मोदींनी घालून दिला आहे. इतर नेत्यांनी मोदींकडून शिकले पाहिजे,” असे जे.पी नड्डा म्हणाले असल्याची माहिती भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी दिली.