भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातील विधानाची मोडतोड करून सोयीचा राजकीय अर्थ लावण्याची पद्धत रुढ झाली आहे. यामुळे गडकरी संतप्त झाले असून त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांना याचा राजकारणात त्रासही होतो. त्यांचे भाषण माध्यमांसाठी पर्वणी असल्याने त्याला ठळकपणे प्रसिद्धी मिळते. मात्र अनेकदा त्यांची विधाने मोडतोड करून त्यातून सोयीचा राजकीय अर्थ काढून प्रसिद्ध केली जातात. अशाच प्रकारे दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातील विधानाची मोडतोड केल्याने गडकरी संतापले आणि असे करणाऱ्यांना ताकीद दिली.
हेही वाचा- ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ केवळ वन विभागातच आणि तेही ऐच्छिक…
यापूर्वी गडकरी यांच्या नागपूर मधील भाषणाची राजकीय वर्तुळात खूप चर्चा झाली होती. ‘लोकशाहीत विरोधी पक्षाला महत्व आहे. त्यामुळे ही व्यवस्था सुदृढ होण्यासाठी काँग्रेस जिवंत राहायला हवी ‘ असे गडकरी म्हणाले होते. एकीकडे भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा केलेली असताना गडकरी यांचे हे विधान चांगलेच गाजले होते. त्याचप्रमाणे नागपुरातच त्यानी ‘ राजकारण सोडून द्यावसे वाटतं’ अशी व्यक्त केलेली भावना राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली होती.
हेही वाच- प्रश्नांवर समाधान करण्याची जागा विधानसभेचे सभागृह; विधानसभा अध्यक्षांचे दालन नव्हे
‘ गांधी, नेहरू, पटेल यांच्या काळात राजकारण हे समाजकारण होतं. आता राजकारण हे सत्ताकारण झालं. त्यामुळे राजकारण सोडून द्यावसं वाटतं’ असे ते म्हणाले होते. आपल्या विधानाचा विपर्यास केला जातो, असे या पूर्वी अनेक वेळा गडकरी यांनी जाहीरपणे सांगितले होतं आता मात्र त्यांनी कारवाईचाच इशारा दिला आहे.